अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :- लॉकडाउनच्या प्रदीर्घ काळानंतर साईबाबांचे मंदिर भाविकांसाठी खुले झाल्यानंतर ७१ दिवसात सुमारे १२ लाख २ हजार १६२ भाविकांनी दर्शन घेतले.
या काळात भाविकांनी साईंच्या झोळीत सुमारे ३२ कोटी ३ लाख ४२ हजार ९०० रुपयांचे भरभरून दानही अर्पण केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर देश- विदेशातील करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले साईबाबा समाधी मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले होते.
प्रदिर्घ काळानंतर १६ नोव्हेंबरपासुन कोरोना नियमावलीची काटेकोर अमंलबजावनी करण्याच्या अटीवर राज्य सरकारने साईमंदीर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्याचा निर्णय घेतला.
साईसंस्थान प्रशासनाने अहोरात्र मेहनत घेवून कोरोनाबाबत विविध प्रकारच्या उपाययोजना करून भाविकांना सुकर व समाधानकारक दर्शन व्यवस्थेबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केले असल्याची माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी दिली.
विशेष म्हणजे तिरुपतीसारख्या गर्भश्रीमंत देवस्थानच्या अध्यक्षांनी शिर्डीतील दर्शनव्यवस्थेचे तोंडभरून कौतुक केले. शिर्डी ग्रामस्थांसाठी सुकर दर्शनासाठी कोविडच्या निर्णयांची काटेकोर अमंलबजावनी करत स्वतंत्र दर्शनाची व्यवस्था केली; मात्र याबाबत ग्रामस्थांना अधिक सुकर दर्शन घेण्यासाठी साईसंस्थान प्रशासन प्रयत्नशील आहे.
त्यासाठी ग्रामस्थांच्या सूचनांचा अभ्यास करून भाविकांच्या दर्शनलाईनमध्ये कोणताही अडथळा येणार नाही, याची काळजी घेऊनच तीन व चार नंबर प्रवेशद्वार खुले करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. साईसंस्थान ग्रामस्थांच्या दर्शनाबाबत सकारात्मक आहे, असेही बगाटे यांनी स्पष्ट केले.
साईसंस्थानच्या साईप्रसाद भक्तनिवास, साईबाबा भक्तनिवास, साईआश्रम भक्तनिवास, द्वारावती भक्तनिवास आदी भक्तनिवासात सुमारे ३ लाख २० हजार ६३९ भाविकांनी निवासात लाभ घेतला. त्याचप्रमाणे ७१ दिवसांत भाविकांसाठी १७ लाख साई उदी पाकीटांची निर्मिती करण्यात येवून त्यातील १० लाख ४३ हजार पाकीटांचे वाटप करण्यात आले.
दि. १६ नोव्हेंबर २०२० ते २५ जानेवारी २०२१ या काळात, रोख स्वरूपात- ६ कोटी १८ लाख ७० हजार ३६१, मनिऑर्डरद्वारे- ५० लाख ७१ हजार ९७९, ऑनलाईन देणगी- ६ कोटी ३९ लाख १ हजार ८९६, डेबिट-क्रेडिट कार्डद्वारे- २ कोटी ६२ लाख २८ हजार ३२६, चेक,
डीडीद्वारे- ३ कोटी ५ लाख ८९ हजार ६२६, परकीय चलन- २२ लाख ६० हजार १६५, दक्षिणा पेटीतील देणगी- १३ कोटी ४ लाख २० हजार ५४७ रुपये संस्थानला प्राप्त झाले. तसेच ७१ दिवसात ७९६ ग्रॅम सोने आणि १२ हजार १९१ ग्रॅम चांदीचे दान प्राप्त झाले.