Ahmednagar news : अहमदनगर जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक पर्वणी लाभलेली आहे. जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. विशेष म्हणजे काही ऐतिहासिक स्थळे अगदी रामायणकालीन देखील आहेत. उदा.नारदी ६० पुत्रांच्या समाध्या, सीतामाईला ज्या ठिकाणी कुंकू लावले ते कुंकुमस्थान आदी.
अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यात अनेक धार्मिक स्थळे आहेत. रामायण व महाभारत ग्रंथात कोपरगाव तालुक्यातील धार्मिक स्थळांचा उल्लेख सापडतो. दक्षिणगंगा गोदावरीच्या अमृत सिंचनाने व प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या परिसरात प्राचीन काळी अनेक ऋषीमुनी, तपस्वी महापुरुष, साधूसंत महात्मे यांनी गोदावरीच्या तटी यज्ञ, याग, तपश्चर्या, ध्यानधारणा केली आहे.
नारदाचे नारदीत रूपांतर झाले व नारदीला ६० पुत्र झाले आणि म्हणून ‘साठ संवत्सरे’ या नावाने हे ओळखले जाते अशी एक कथा सांगितली जाते. गोदावरीच्या नदीपात्रात नारद व नारदाच्या ६० पुत्रांच्या समाध्या आहेत. कोपरगाव रेल्वे स्थानकावरून शहराकडून संवत्सर गावाकडे काही अंतर चालून गेल्यावर संवत्सर गावानजीक गोदापात्रात नारदी नदीचा प्रवाह आहे.
नारदमुनींचे नारदीत रूपांतर झाल्यानंतर एक कोळी इसम त्यांना घरी घेऊन आला. त्यांचे लग्न झाले व त्यानंतर नारदीला 60 मुले झाली. दरम्यान या संसारात त्रासल्यानंतर तिने भगवान श्रीकृष्णाचा धावा केला. भगवंतांनी संसारपाशातून नारदाची सुटका करण्यासाठी ‘नारदी’ झालेल्या नारदास पुन्हा संगमावर जाऊन ‘नारीहर’ असे म्हणत पाण्यात बुडी घ्या असं सांगतिले.
त्यानंतर नारदास नरदेह प्राप्त झाला. ते पुन्हा नामसंकीर्तनात रमत त्रैलोक्याच्या भ्रमणास गेले. नारदाची 60 मुले येथेचं राहिली व वस्ती निर्माण झाली तेच ‘संवत्सर’ होय. आजही संवत्सर येथे त्या 60 नारदी पुत्रांच्या समाध्या आहेत.
ही आहेत आणखी काही तिर्थक्षेत्र
महानुभाव पंथाचे श्री चक्रधर स्वामींचे स्थान, श्रीकृष्णाचे मंदिर, नारदीच्या पुत्रांच्या ६० समाध्या, श्रृंगऋतींचे पुरातन मंदिर, सीतामाईला ज्या ठिकाणी कुंकू लावले ते कुंकुमस्थान, विष्णूचे हेमाडपंथी कलाकुसरीचे मंदिर, आधुनिक काळातील महान संत पपू रामदासी महाराज, जवळच असणारे पुणतांबा येथील चांगदेव समाधी,
जंगलीदास महाराजांचा आश्रम, धामोरी येथील गोरक्षनाथाची चिंच, प्रभु श्रीरामचंद्राने पिता राजा दशरथांचा तर्पण विधी केला ते डाऊच गाव, चासनळी या गावी मायावी मारिच हरणाने उड्या मारत केलेले पलायन, त्याला मारलेला बाण, महानगुरू दैत्यगुरु शुक्राचार्य, संजीवनी मंत्र, जुनी गंगा अशी अनेक धार्मिक तीर्थक्षेत्रे आहेत.
लक्ष देण्याची गरज
संवत्सर (ता. कोपरगाव) येथील दुर्लक्षित नारदीच्या ६० पुत्रांच्या समाध्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे अन्यथा ते काळूआघात नष्ट होऊन जाण्याची शक्यता आहे. इतर धार्मिक स्थळांचीही काळजी घेणे गरजेचे आहे. या स्थळांचा इतिहास जिवंत ठेवला जावा, अशी मागणी इतिहासप्रेमी करत आहेत.