अहिल्यानगर- भारतीय इतिहासात महिलांचा सन्मान हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. आजच्या आधुनिक काळात सरकारी कागदपत्रांमध्ये आईचे नाव समाविष्ट करण्याचा निर्णय २०२४ मध्ये लागू झाला, जो एक प्रगतीशील पाऊल मानला जातो. परंतु, यापेक्षा कितीतरी शतके मागे गेल्यास, प्राचीन शिलालेखांमधून महिलांना दिलेला मान आपल्याला आश्चर्यचकित करतो.
असाच एक दुर्मीळ आणि महत्त्वाचा शिलालेख गांजीभोयरे या गावात सापडला आहे, जिथे २५६ वर्षांपूर्वी एका महिलेचे नाव तिच्या पतीच्या नावापूर्वी लिहिले गेले आहे. हा शिलालेख केवळ इतिहासाचा साक्षीदार नाही, तर तत्कालीन समाजातील स्त्रियांबद्दलच्या सकारात्मक दृष्टिकोनाचेही उदाहरण आहे.

२५६ वर्षांपूर्वीचा शिलालेख
गांजीभोयरे हे गाव विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर देवनागरी लिपीत कोरलेला एक चार ओळींचा शिलालेख आहे. इतिहास संशोधक सतीश सोनवणे यांनी या शिलालेखाचे सखोल वाचन केले आणि त्यातून एक आश्चर्यकारक माहिती समोर आली. या शिलालेखात असे नमूद आहे की, एका महिलेसह तिच्या पतीने हे मंदिर बांधले. विशेष म्हणजे, या शिलालेखात महिलेचे नाव प्रथम आणि त्यानंतर तिच्या पतीचे नाव लिहिले गेले आहे. आजच्या काळातही अनेक लग्नपत्रिकांमध्ये महिलांची नावे समाविष्ट होत नाहीत, तिथे २५६ वर्षांपूर्वीचा हा शिलालेख स्त्रियांना दिलेल्या मानाचे एक ठळक उदाहरण ठरतो.
महिलांचे महत्व
हा शिलालेख आपल्याला प्राचीन काळातील सातवाहन सम्राटांच्या परंपरेचीही आठवण करून देतो. सातवाहन राजे आपल्या नावापुढे आईचे नाव जोडत असत. उदाहरणार्थ, गौतमीपुत्र सातकर्णी या प्रसिद्ध सातवाहन सम्राटाने स्वतःला ‘गौतमीचा पुत्र सातकर्णी’ असे संबोधले होते. या परंपरेतून त्याकाळी मातृसत्ताक समाजाचा प्रभाव आणि महिलांचे महत्त्व अधोरेखित होते. मात्र, सातवाहन कालखंडानंतर असे शिलालेख फारच दुर्मीळ झाले. त्यामुळे गांजीभोयरे येथील हा शिलालेख एक अपवादात्मक आणि अभ्यासपूर्ण ठेवा मानला जातो, जो तत्कालीन समाजात महिलांना असलेले स्थान दर्शवतो.
शिलालेखातील माहिती
सतीश सोनवणे यांनी या शिलालेखाचा अर्थ उलगडताना सांगितले की, हा शिलालेख श्री पांडुरंगाच्या भक्तीशी निगडित आहे. त्यात नमूद आहे की, सखुबाई पांढरे आणि त्यांचे पती जिवाजी पांढरे यांनी शालिवाहन शक १६९० मध्ये, सर्वधारी संवत्सरात, मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी या गुरुवारी श्री पांडुरंगाच्या मंदिराचे बांधकाम सुरू केले. हे बांधकाम शके १६२१ मध्ये, विरोधी संवत्सरात, मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशीला पूर्ण झाले. या शिलालेखातून हे स्पष्ट होते की, सखुबाई पांढरे यांना केवळ सहभागी म्हणून नव्हे, तर मंदिराच्या निर्मितीत प्रमुख व्यक्ती म्हणून सन्मानाने नोंदवले गेले आहे. वारकरी संप्रदायातही महिलांना विशेष स्थान आहे, आणि हा शिलालेख त्या विचारसरणीचा पुरावा ठरतो.
ऐतिहासिक पुरावा
हा शिलालेख केवळ एका मंदिराच्या निर्मितीची नोंद नाही, तर त्या काळातील सामाजिक मूल्यांचा आणि लिंगसमानतेचा दस्तऐवज आहे. आजच्या काळातही अशा ऐतिहासिक उदाहरणांमधून प्रेरणा घेऊन आपण महिलांच्या सन्मानाला अधिक प्राधान्य देऊ शकतो. गांजीभोयरे येथील हा शिलालेख म्हणजे इतिहासाच्या पानांत दडलेले एक मौल्यवान रत्न आहे, जे आपल्याला भूतकाळातील प्रगत विचारांचा परिचय करून देते.