अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली आहे. रात्रीच्या अंधारात होणाऱ्या चोऱ्या आता दिवसाढवळ्या होऊ लागल्या आहेत. यातच जामखेड तालुक्यातील जातेगाव येथे चोरटयांनी धुमाकूळ घातलाय.
काही ठिकाणी घरफोडी झाली तर काही ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न झाला. यामुळे गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, जामखेड तालुक्यातील जातेगाव मध्ये चोरटयांनी एकाच रात्री आठ ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला.
येथील बालाजी अंकुश सहा हजार रोख, भरत ऐडबा गायकवाड दोन पितळी घागर, बाजीराव किसन गायकवाड दोन चांदीचे जोडवे, मनोहर नरशिंग गायकवाड मोबाइल, जर्किंग तसेच ईश्वर आमरुळे, शहादेव काळे, भागवत मनोहर गायकवाड, संतोष सोपान भोसले यांचे घर उघडून चोरीचा प्रयत्न केला.
चोरीची घटना घडल्याची माहिती मिळताच खर्डा चौकीचे पोलीस पथक घटनास्थळी हजर झाले. त्यांनी संबंधित ठिकाणी जाऊन घटनास्थळाची पाहणी केली आहे.
दरम्यान तालुक्यातील जातेगाव परिसरात भुरट्या चोऱ्यांच्या प्रकारांत वाढ झाली आहे. यामुळे या चोरट्यांना तातडीने पकडावे अशी मागणी नागरिक करू लागले आहे.