Ahmednagar News : सहकारी संस्थेत निवडणुकीपुरते राजकारण ठिक आहे; पण सतत व टोकाचे राजकारण संस्थांच्या हिताचे ठरत नाही. त्यामुळे आर्थिक पाया ठिसूळ होतो. तेव्हा सहकारी संस्थाचालकांनी सभासदाचे निर्णय घेऊन संस्था टिकण्यासाठी विविध उत्पन्नाचे पूरक उद्योग,
व्यवसाय निर्माण केले पाहिजे, असे आवाहन राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अरुण तनपुरे यांनी केले.
राहुरी तालुक्यातील आरडगाव येथील आरडगाव विविध विकास सेवा संस्थेने आपल्या सभासदांना दीपावली निमित्ताने लाभांश दिला. त्याचे वितरण तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपस्थित सभासद शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना अरुण तनपुरे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सभासद भाऊसाहेब रघुनाथ झुगे होते. यावेळी प्रामुख्याने किशोर वने, सुरेश झुगे, बापूसाहेब ढेरे, रंगनाथ काळे, पोपट झुगे, चेअरमन जालिंदर काळे, व्हा. चेअरमन शोभा चंद्रभान झुगे उपस्थित होते.
प्रास्ताविकात संचालक सुनील मोरे यांनी सांगितले, की संस्थेची विस्तारित नवीन इमारत लवकरच उभी राहील. त्यानंतर भविष्यात आरडगाव सोसायटी स्व मालकीचा पेट्रोल पंप व सेतू कार्यालय सुरू करणार आहे. तसा सर्वसाधारण सभेचा ठराव ग्रामपंचायतला देऊन रस्त्यालगत एक एकर जागा मिळण्यासाठी मागणी केलेली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बाबासाहेब शेळके, नाथा झुगे, राहुल झुगे, लक्ष्मण जाधव, अंकुश देशमुख, शैलेंद्र म्हसे, सुनील झुगे, अर्जुन वने, कृष्णनाथ भांड, मनोहर म्हसे, दत्तात्रेय म्हसे, महेश काळे हे संचालक तसेच चांगदेव वने, विलास धसाळ, केशव म्हसे, जालिंदर शेळके, बाळासाहेब म्हसे, बाळासाहेब झुगे, प्रभाकर काळे यांच्यासह सभासद, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तनपुरे म्हणाले, की आरडगाव सोसायटी चांगल्या प्रकारे, काटकसरीने कारभार करत असल्याने प्रतिवर्षी सभासदांना लाभांश देत आहे. संस्थेने आपल्या रिझर्व फंडातून सुमारे १४ ते १५ लाख रुपये व सभासदांना लाभांश वाटून उर्वरित नफ्यातून सुमारे सात लाख रुपये अशा पद्धतीचा सुमारे २३ ते २४ लाख रुपये इमारत निधी उपलब्ध करून ठेवला.
हा अत्यंत दूरदृष्टीपणाने संस्थेच्या हिताचा निर्णय संचालक मंडळांनी घेतला असल्याचे ते म्हणाले. सूत्रसंचालन संस्थेचे चेअरमन जालिंदर काळे यांनी, तर स्वागत सचिव शाम तनपुरे यांनी केले. आभार सुनील मोरे यांनी मानले.