अहमदनगर Live24 टीम, 05 ऑक्टोबर 2021 :- कोरोनामुळे प्रदीर्घ काळापासून बंद असलेले राज्यातील धार्मिक स्थळ पुन्हा एकदा उघडणार आहे. यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण आहे.
यातच जगात ख्याती असलेलं करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेलं शिर्डी येथील साई मंदिर देखील उघडणार आहे. यामुळे भाविकांना आता साईंचे दर्शन घेता येणार आहे.
मात्र दरदिवशी 15 हजार भाविकांना दर्शन पास मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे. श्री साई संस्थानच्यावतीने साई दर्शनासाठी दिवसाला पंधरा हजार दर्शन पासची व्यवस्था भाविकांसाठी ठेवण्यात आल्याची माहिती श्री साई संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.
कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील धार्मिक तीर्थक्षेत्रे सात महिन्यांपासून बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे शिर्डी शहरातील आंतरराष्ट्रीय देवस्थान असलेल्या साईबाबांच्या मंदिराच्या इतिहासात प्रथमच साई मंदिर बंद करण्यात आले होते.
मात्र नुकतेच राज्यसरकारने याबाबत सकारात्मक निर्णय घेत घटस्थापनेच्या दिवशीपासून मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे 7 ऑक्टोबर रोजी शिर्डी मंदिर खुले करण्यात येणार आहे.
श्री साईबाबा संस्थानच्या वतीने एका दिवसाला 15 हजार पासेससची व्यवस्था भाविकांसाठी करण्यात आली असून त्यामध्ये 5 हजार फ्री ऑनलाईन पद्धतीने,
5 हजार ऑफलाइन पद्धतीने (बायोमेट्रिक) तर पाच हजार पासेस सशुल्क पद्धतीने असे नियोजन करून दोन भाविकांमध्ये अंतर सहा फुटावर असे मार्किंग करण्यात आले आहे. तसेच थर्मल स्क्रीनिंग, सॅनिटायझरची व्यवस्था मोठ्या प्रमाणात केली आहे.