श्रीगोंद्यात फळविक्रेत्याकडून ग्राहकाच्या डोक्यात कोयत्याने वार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : सफरचंद बारीक असल्याने भाव कमी कर, असे म्हणाल्याचा राग आल्याने फळविक्रेत्याने फळे खरेदीसाठी आलेल्या दोन तरुणांना शिविगाळ करून मारहाण करत यातील एका तरुणाच्या डोक्यात नारळ फोडण्याच्या कोयत्याने वार केले. या वेळी प्रेमदास उबाळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी शेखर दत्तात्रय गव्हाणे रा. आढळगाव यांच्या फिर्यादीवरून अतिक बागवान, अजर बागवान, जुबेर बागवान, सर्व रा. श्रीगोंदा यांच्याविरुद्ध श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तीन आरोपींना अटक करत न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

याबाबत पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसारः फिर्यादी आणि जखमी हे रविवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा शहरातील बगाडे कॉर्नर परिसरातील फळ विक्रेत्याकडे दोन तरुण सफरचंद विकत घेण्यास गेले होते.

या वेळी फिर्यादीने सफरचंद बारीक असल्याने भाव कमी करण्यास सांगितले, याचा राग येऊन अजर बागवान याने फिर्यादीला शिविगाळ करण्यास सुरवात केली. या वेळी जखमी यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, अतिक बागवान व जुबेर बागवान, या दोघांनी फिर्यादी आणि जखमी यांना शिवीगाळ करत हे लई शहाणपण करतायेत, यांना जिवंत सोडू नका रे, असे म्हणत मारहाण करण्यास सुरुवात केली.

तर अतिक बागवान याने हातातील नारळ फोडण्याच्या कोयत्याने जीवे मारण्याच्या उद्देशाने प्रेमदास उबाळे रा. आढळगाव याच्या डोक्यात वार केले. डोक्यात कोयत्याचे वार झाल्याने गंभीर जखमी झालेल्या प्रेमदास उबाळे याला पुढील उपचारासाठी नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.