Ahmednagar News : मागील काही दिवसांपासून अहमदनगरच्या श्रीगोंदा, पारनेर, त्यानंतर शेवगाव, पाथर्डी तालुक्यात रात्री काही गावांमध्ये ड्रोन सदृश्य वस्तू आकाशात घिरट्या घालत असल्याने आढळून आले. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी मोबाईलमध्ये त्या ड्रोन सदृश्य वस्तूंची चित्रिकरण केले.
तसेच ते सोशल मीडियावर व्हायरल केले. परंतु या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक नागरिक रात्री उशिरापर्यंत भयभीत होऊन रस्त्यावर आले होते.
त्याचा अद्याप कोणताच धागेदोरे लागले नसतानाच परत जामखेड तालुक्यातील काही गावांत ड्रोन घरांवर घिरट्या घालत असल्याने नागरिकांची झोप उडवली आहे. ड्रोनच्या घिरट्या चोरीच्या उद्देशानेच असल्याची चर्चा आहे. याबाबत तक्रारी आल्याने पोलिस प्रशासन अलर्ट झाले आहे.
जवळा व मुंजेवाडी परिसरात रात्रीच्या वेळी घरांवर ड्रोनच्या घिरट्या घालत असल्याचे नागरिकांनी दूरध्वनीद्वारे जामखेडचे पोलिस निरीक्षक महेश पाटील यांना कळविले. त्यानुसार तत्काळ पोलिसांनी जवळा व मुंजेवाडी परिसरात भेट दिली.
पण तोपर्यंत ड्रोन गायब झाले होते. या परिसरात ७ सप्टेंबरला रात्री ११ वाजता शेतकरी उडीद करण्याचे काम सुरू असताना त्यांना आकाशात ड्रोन घिरट्या घालताना दिसले.
शेतकऱ्यांनी सुरुवातीला ड्रोनकडे दुर्लक्ष केल, पण नंतर ते ड्रोन शेतकऱ्यांच्या घरांवर अर्धा तासापेक्षा अधिक वेळ घिरट्या घालत असल्याचे आढळले. त्यानंतर शेतकऱ्यांनी एकमेकांना दूरध्वनी करीत ड्रोनचा पाठलाग केला. तेव्हा ड्रोन गायब झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
सध्या उडीद काढणीला, तर काहींनी बाजारात विक्री पाठविला आहे. त्यामुळे उडीद पिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हातात दोन पैसे येत असल्याने चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे.
त्यातच सण- उत्सवांमुळे पैशाचा जास्त वापर होताना दिसत आहे. घरात पैसे ठेवण्याचे प्रमाण जादा असल्याने चोरट्यांनी ड्रोनच्या माध्यमातून वाँच ठेवल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.