गेल्या तीन महिन्यांपासून पुणे, नगर आणि कोल्हापुरात झिका विषाणूचे रुग्ण आढळून येत होते. राज्यात या वर्षात आतापर्यंत एकूण आठ रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच झिका व्हायरसची भीषणता पाहत्ता केंद्र सरकारने महाराष्ट्रासह सर्व राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
विशेष म्हणजे जुलै २०२१ मध्ये पुरंदर तालुक्यातील बेलचर आणि परिचे येथील प्राथमिक आरोग्य वैद्यकीय केंद्रात झिकाची पहिली ५२ वर्षीय महिला रुग्ण आढळून आली होती. तेव्हापासून राज्यात झिकाचे एकूण २९ रुग्ण आढळून आले असून, २४ मे त्यातील पासून ८ रुग्ण आढळून आले आहेत.
या वर्षी मे महिन्यात कोल्हापूर, नगरमध्ये सहा आणि पुण्यात जून आणि जुलैमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. आरोग्यविभागाच्या म्हणण्यानुसार झिका हा डासांमुळे पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. हे प्रामुख्याने दिवसा चावणाऱ्या एडिस डासामुळे पसरणाऱ्या विषाणूमुळे होते. झिका विषाणू फ्लेविव्हायरस वंशातील आहे आणि हा एडिस डासामुळे पसरतो.
केंद्र सरकारचा सर्व राज्यांना सल्ला
महाराष्ट्रात झिका विषाणूचे रुग्ण आढळल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सर्व राज्यांना एक सल्ला जारी केला. आरोग्य मंत्रालयाने राज्यांना गर्भवती महिलांमध्ये संसर्गाचे परीक्षण करून, झिकाची लागण झालेल्या गर्भवती महिलांच्या गर्भाच्या विकासावर सतत लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.
आरोग्य सुविधा आणि रुग्णालयांतील आवार एडिस डासांपासून मुक्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच देखरेख आणि कारवाई करण्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करावा. राज्यांना निवासी क्षेत्रे, कामाची ठिकाणे, शाळा, बांधकाम साइट्स, संस्था आणि आरोग्य सुविधांमध्ये पाळत ठेवणे आणि वेक्टर नियंत्रण क्रियाकलाप तीव्र करण्यास सांगितले आहे.
लक्षणे
झिकाची लागण झालेल्या बहुतांश रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. हे साधारणपणे डेंग्यूसारखेच असतात. याची लागण झालेल्या रुग्णांमध्ये ताप, अंगावर पुरळ, डोळ्यात जळजळ, सांधे आणि आणि स्नायू दुखणे, थकवा आणि डोकेदुखी अशी लक्षणे दिसतात. ही लक्षणे सहसा सौम्य असतात आणि २ ते ७ दिवस टिकतात. झिकाच्या बाबतीत बहुतेक प्रकरणांमध्ये रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नसते. तसेच यामध्ये मृत्यूचे प्रमाणही नगण्य आहे.
झिका रोगाची गुंतागुंत
आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार गर्भधारणेदरम्यान झिका विषाणूच्या संसर्गामुळे बाळाचा जन्म मायक्रोसेफली आणि इतर जन्मजात दोघांसह होऊ शकतो, ज्याला जन्मजात झिका सिंड्रोम म्हणतात. मायक्रोसेफली, गुइलेन-बॅरे सिंड्रोम, न्यूरोपॅथी आणि मायलाइटिससह झिका विषाणू संसर्गाशी संबंधित न्यूरोलॉजिकल गुंतागुंत होण्याचा धोका प्रौढ आणि मुलांना असतो.
जनतेला आवाहन
आता राज्यात झिकाची प्रकरणे वाढू लागल्याने सरकारने या आजाराबाबत जनजागृती करण्याचे आवाहन सुरू केले आहे. याबाबत जनतेने घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही, असे या आवाहनात म्हटले आहे. ताप आल्यास ताबडतोब शासकीय रुग्णालयांना कळवावे. हा आजार आढळून आला की सरकारी रुग्णालयात मोफत उपचार केले जातात. यासोबतच खासगी वैद्यकीय संस्थांनाही असे रुग्ण आढळून आल्यास सरकारी यंत्रणेमार्फत एनआयव्ही पुणे येथील नमुने तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.