Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार खुर्द येथे विशेष ग्रामसभेत इतर विषयांवर सविस्तर चर्चा होऊन त्यावर सर्व संमतीने निर्णय घेत खेळीमेळीत ग्रामसभा चालू असताना ग्रामसेविकांनी एक माहिती अधिकाराचा अर्ज ग्रामसभेत वाचून दाखविला.
त्यावेळी सत्ताधारी व विरोधक यांच्यात हमरीतुमरी व तु-तु मै मै झाल्याने ग्रामसभेत गोंधळाची परंपरा कायम राहून सभा वादळी ठरली.
कोल्हार खुर्दची विशेष ग्रामसभा काल गुरुवार रोजी सरपंच अनिता शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली सिद्धी बाबा मंदिरात आयोजित करण्यात आली होती. यावेळी या ग्रामसभेत पंचायत समितीच्या काही कर्मचाऱ्यांनी बचत गटांना विविध सवलती व अनुदान या विषयावर मार्गदर्शन केले,
तसेच मनरेगा आणि कृषी विभागाच्या विविध योजना आणि त्याचे फायदे यावर कृषी सहाय्यक शेळके यांनी माहिती दिली, तसेच पशूवैद्यक डॉ. सातपुते यांनी ही लम्पी आजाराबाबत माहिती दिली.
ग्रामसभा खेळीमेळीत चालू असताना ग्रामसेविका यांनी ग्रामस्थांनी दिलेला माहिती अधिकार अर्ज ग्रामसभेत वाचन केला असता त्यावेळी सत्ताधारी व विरोधक यांच्यात बाचाबाची सुरू झाली. या अर्जामध्ये सरपंच पती यांनी ग्रामपंचायत कारभार हस्तक्षेप करू नये व ग्रामपंचायतमध्ये येऊ नये, असा मजकूर होता. त्यावरूनच ग्रामसभेत गोंधळ सुरू झाला. या गोंधळात एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत या ठिकाणी पुढाऱ्यांनी मजल गाठली.
कोल्हार खुर्दची ग्रामसभा म्हटले की गोंधळ आणि बेशिस्त हे समीकरण ठरलेले असते. यामध्ये प्रगल्भ नेतृत्वाचा अभाव व संयम नसलेले विरोधक यामुळे गावच्या विकासावर चर्चा तर दूरच; परंतु सत्ताधारीही नमते घेत नाही आणि विरोधक त्यांना सोडत नाही, अशी सध्याची परिस्थिती असल्याने कोल्हार खुर्दची अस्थिर राजकीय परिस्थिती गावच्या विकासाला अडसर ठरत आहे.