Ahmednagar News : सध्या जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ ,खून या घटना थांबत नसल्याचे एकंदरीत चित्र आहे . राहुरी तालुक्यातील रेल्वेस्टेशन येथे एका ४५ वर्षीय इसमाचा मृतदेह संशयीतरित्या आढळून आला.
या घटनेबाबत पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी ‘त्या’ मयताची अंत्ययात्रा थेट पोलीस ठाण्यात नेण्यात आली. त्यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान यावेळी हि हत्त्या नाजूक कारणावरुन कारणावरूनच झाल्याची आपसात चर्चा करत होते.
राहुरी तालुक्यातील रेल्वेस्टेशन येथील एक ४५ वर्षीय इसम हे जवळच्या एका विटभट्टीवर काम करीत होते. दि.२ ऑगस्ट रोजी सकाळच्या दरम्यान त्यांच्या शेजारी राहत असलेल्या काही लोकांबरोबर त्यांचा वाद झाला. त्यानंतर दुपारी तीन वाजे दरम्यान एक महिला व एका पुरुषाने यांच्या घरी जाऊन त्यांच्या मुलाला ती व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडलेले असल्याचे सांगितले.
त्यानंतर त्या मुलाने परिसरातील शेतात जाऊन पाहिले असता त्या ठिकाणी त्याच्या वडिलांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, सहाय्यक फौजदार तुळशीराम गिते, हवालदार सुरज गायकवाड, संदिप ठाणगे, नदीम शेख, संदीप बडे, चालक उत्तरेश्वर मोराळे आदी पोलीस पथकाने मृतदेह ताब्यात घेतला.
ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीस मयत घोषित केले. त्या व्यक्तीची नाजुक कारणावरुन हत्या झाल्याची चर्चा त्यांच्या नातेवाईकांमध्ये सुरु होती. नातेवाईकांनी त्यांची अंत्ययात्रा थेट पोलीस ठाण्यात नेली. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला.
पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी नातेवाईकांची समजूत काढून शवविच्छेदनचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आरोपींवर गुन्हा दाखल करु, असे आश्वासन दिले. त्यानंतर नातेवाईकांनी अंत्यविधी केला. दरम्यान पोलीस पथकाने एक महिला व एका पुरुषाला संशयीत म्हणून ताब्यात घेतले आहे.