अहमदनगर बातम्या

अहमदनगरच्या या गावात जमिनीला पडल्या भेगा, बोअरवेलचे पाणी गायब

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Ahmednagar News :-संगमनेर तालुक्यातील पठार भागातील बोरबन गावाजवळील सराटी परिसरात जमिनीला अचानक भेगा पडल्या आहेत. तेथील बोअरवेलचे पाणीही गायब झाल्याने ग्रामस्थांमध्ये काळजीचे वातावरण आहे.

यासंबंधी तज्ज्ञांमार्फत तपासणी सुरू असून ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन संगमनेरचे तहसिलदार अमोल निकम यांनी केले आहे.

भूर्गभातील हालचाली सतत अनुभवायला येणाऱ्या या भागात बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. संगमनेर तालुक्यातील बोरबन, सराटी परिसरात टेकडवाडी वस्तीवर बुधवारी सकाळच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे.

एका बाजूला डोंगर व दुसरीकडे नदीपात्र काही अंतरावर आहे. अशा ठिकाणी असलेल्या टेकडवाडी वस्तीजवळ या भेगा आढळून आल्या आहेत. बोरबन गावचे सरपंच संदेश गाडेकर यांनी प्रशासनाला याची माहिती दिली.

त्यानुसार तलाठी दादा शेख व कर्मचारी शशिकांत खोंड यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेची माहिती नाशिकच्या मेरी संस्थेला कळविली आहे.

भूजल सर्वेक्षण संस्थेच्या अधिकाऱ्यांशीही बोलणे झाले असून अधिकारी येथे पाहणी करणार आहेत, अशी माहिती संगमनेरचे तहसिलदार अमोल निकम यांनी दिली.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office