अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :- ऐन निवडणुकीच्या धामधुमीत चोरट्यांनी देखील आपला हात साफ करण्याचा सपाटाच लावल्याचे चित्र सध्या जिल्हाभरात पहावयास मिळत आहे.
पारनेर तालुक्यातील गारगुंडी येथील हॉटेल व्यावसायिकाचे घर फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ५ लाख ३५ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर असे की, पारनेर तालुक्यातील गारगुंडी येथील रहिवासी व हॉटेल व्यावसायिक तुषार गंगाधर ठुबे यांचे पहिल्या मजल्यावरील बंद असलेल्या घराचा दरवाजाच अज्ञात चोरट्यांनी कशानेतरी उघडून आत प्रवेश केला.
रात्रीच्या वेळी घरातील बेडरूमधील कपाटात ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या बॉक्सची उचकापाचक करून दागिने व रोख रक्कम असा एकूण ५ लाख ३५ हजार रूपयांचा ऐवज लंपास केला आहे.
याबाबत ठुबे यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोसई पदमने हे करत आहेत.