बाळ बोठेच्या अडचणीत वाढ,वाचा सुनावणी दरम्यान कोर्टात काय घडले ?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :- रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ ज. बोठे याचा आज जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. यामुळे बाळ बोठे याच्या अडचणीत वाढ झाली आहे.

30 नोव्हेंबरला जातेगाव घाटात रेखा जरे पाटील यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केल्यानंतर पत्रकार बाळ बोठे यानेच हत्येची सुपारी दिल्याचे समोर आले.

बोठे याने जिल्हा न्यायालयात ॲड. महेश तवले यांच्यामार्फत अटकपूर्व जामीनासाठी 7 डिसेंबर रोजी अर्ज केला होता. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एम.नातू यांच्यासमारे या अर्जावर मंगळवारी सुनावणी झाली.

काल झालेल्या सुनावणीत आरोपीचे वकील महेश तवले यांनी जोरदार बचाव केला. बाळ बोठे याने मे महिन्यात तो काम करत असलेल्या वर्तमानपत्रात हनीट्रॅप विषयी वृत्त प्रकाशित केले होते. त्यामध्ये सागर भिंगारदिवे याचा उल्लेख होता. त्यात बोठे काम करत असलेल्या वर्तमानपत्रातील कर्मचारी व अधिकारी यांच्या विरोधात गुन्हे दाखल होतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती.

रेखा जरे यांना बोठे मारून टाकतील, असे काही कारण नव्हते. भिंगारदिवे याचा हनीट्रॅप मालिकेतून पर्दाफाश केला होता. त्यामुळे भिंगारदिवे याला बोठे संपर्क का करतील? जरे यांची सुपारी भिंगारदिवेला का देतील? असा सवाल तवले यांनी उपस्थित केला. तसेच भिंगारदिवे याने नाव घेतले म्हणून बोठे यास पोलिस कोठडी देण्याची गरज नाही असेही ते म्हणाले.

त्यावर सरकार पक्षाच्या वतीने सरकारी अभियोक्ता सतीश पाटील यांनी युक्तिवाद केला. पाटील म्हणाले की, तपासी अधिकाऱ्यांनी जरे यांच्या घरातून जरे यांनी लिहिलेले एक पत्र हस्तगत केले आहे. त्यामध्ये जरे यांनी, बोठे माझा मानसिक व शारीरिक छळ करत असल्याचे लिहिले आहे.

२४ नोव्हेंबरला करंजी घाटात जरे यांना मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तो प्रयत्नही फसला. त्यानंतर ३० नोव्हेंबरला जरे यांची हत्या करण्यात आली. २४ नोव्हेंबर व ३० नोव्हेंबर रोजी आरोपी बोठे हा सागर भिंगारदिवे, रेखा जरे व विजयमाला माने यांच्या संपर्कात असल्याचे कॉल रेकॉर्ड करून स्पष्ट होत आहे. हनीट्रॅपच्या बातम्या या फक्त बोठे काम करत असलेल्या वर्तमानपत्रातच छापून आल्या.

पोलिसांच्या कॉल रेकॉर्डमध्ये हत्याकांडाच्या दिवशी बोठे हा सातत्याने जरे यांना संपर्क साधून त्यांचे ठिकाण कुठे आहे, त्याची माहिती घेत होता. तसेच त्यानंतर बोठे याचे सागर भिंगारदिवे याला अनेकदा फोन झाले आहेत. याचा तपास पोलिसांना करायचा आहे. त्यामुळे बोठे याचा अटकपूर्व जामीन नामंजूर करण्याची मागणी सरकारी पक्षाच्या वतीने करण्यात आली होती.

काल कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. आज तो सुनावण्यात आला. जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांनी बोठे याचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला आहे. त्यामुळे पोलिसांना गुंगारा देत फरारी असलेल्या बोठे याच्यासमोरील अडचणी आता वाढल्या आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24