पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भीमा व घोड या नद्यांना महापुर आला असून, गुरुवारी (दि.२५) रोजी संध्याकाळी भिमा नदीला ८० हजार ८७८ क्युसेकने विसर्ग सुरू असून, रात्रीतून विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याने महसूल प्रशासनाने भीमा व घोड नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
घोड धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे काष्टी, सांगावी दुमाला तसेच नदीकाठच्या गावांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे खडकवासला व इतर धरणांतून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असल्याने भिमा नदीपात्रात ८० हजार ८७८ क्युसेकने विसर्ग सुरू असून, विसर्गामध्ये रात्रीतून १ लाख ते १ लाख ५० हजार क्युसेकने वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती तहसीलदार डॉ. क्षितिजा वाघमारे यांनी दिली.
भीमा नदीला गुरुवारी रात्रीपासून एक लाख ते दीड लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होण्याची शक्यता असून, विसर्ग वाढल्यास भीमानदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन तालुक्यातील आर्वी बेटाला पाण्याचा वेढा पडू शकतो, त्या अनुषंगाने गुरुवारी दुपारी भाजपचे युवक प्रदेशाध्यक्ष विक्रम पाचपुते, तहसीलदार डॉ. क्षितिजा वाघमारे, गटविकास अधिकारी राणी फराटे यांनी आर्वी बेटाला भेट देत नागरिकांशी चर्चा केली.
अडचण आली तर तात्काळ महसूल प्रशासनाशी संपर्क करण्याच्या सुचना देत सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच भीमा नदीतील पाणीपातळीत वाढ झाल्यास आर्वी बेटातील नागरिकांनी बाहेर येण्यासाठी एका स्पीड बोटची व्यवस्था करण्यात आली असून, या स्पीड बोटीची पाहणी तहसीलदार डॉ. वाघमारे आणि विक्रम पाचपुते यांनी केली. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी रामकृष्ण जगताप यांच्यासह तलाठी व सर्कल उपस्थित होते.