Ahmednagar News : संगमनेर शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या हायटेक बसस्थानकात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या बस स्थानकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलीस बंदोबस्त असतानाही सातत्याने महिलांचे दागिने चोरी होत आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
सुमारे बारा कोटी रुपये खर्च करून संगमनेर येथे अद्यावत बस स्थानक बांधण्यात आलेले आहे. या भव्य बस स्थानकामध्ये सर्व सुविधा असल्याने उत्तर महाराष्ट्रातील हे प्रमुख बस स्थानक बनले आहे.
या बस स्थानकामध्ये नागरिकांची नेहमी वर्दळ असते. चोरट्यांनी या गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे दागिने चोरण्याचा सपाटा लावला आहे. या बस स्थानकामध्ये सातत्याने चोरीच्या घटना घडत आहे.
गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास शहरातील गणेशनगर येथील रहिवासी कुसुम सर्जेराव माघाडे या सेवानिवृत्त शिक्षिका गुरुवारी सायंकाळी दिवाळीनिमित्त आपल्या मुलाकडे लोणी येथे जाण्यासाठी संगमनेर बसस्थानकात आल्या होत्या.
त्या बस मध्ये बसत असताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत त्यांच्या बॅगेमधील तीन तोळे सोन्याचा राणी हार, एक तोळा सोन्याचे मिनी गंठन, दोन तोळे वजनाची सोन्याची चेन, मोबाइल व रोख रक्कम, असा मुद्देमाल चोरून पोबारा केला.
याप्रकरणी कुसूम माघाडे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बसमध्ये चढ-उतार करणाऱ्या प्रवासी महिलांचे दागिने चोरून नेण्याच्या घटना वाढल्या आहे.
त्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत आगर प्रमुख प्रशांत गुंड यांच्याशी संपर्क साधला असता बसस्थानकात चोऱ्या होवू नये म्हणून आठ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. मात्र ते कमी पडत आहे
म्हणून आणखी चौदा सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, यासाठी वरिष्ठ विभागाकडे पाठपुरावा केल्याचे त्यांनी सांगितले.