Ahmednagar News : भारतीय शेती जगातील सर्वात प्राचीन व यशस्वी शेती पद्धती आहे. हिच पारंपरिक सेंद्रिय शेती पद्धती जगासाठी आदर्श ठरेल.
भारतीय शेतकरी हा व्यापारासाठी शेती करत नाही, तर जगाचं पोट भरावं म्हणून शेती करतो. हिच आपली आदर्श संस्कृती आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केलं.
श्रीक्षेत्र सराला बेट येथे अखिल भारतीय ग्रामविकास अभ्यास वर्गात समारोपीय सत्रात डॉ. भागवत बोलत होते.
सराला बेट येथे गुरुवारी सकाळी त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले, त्यानंतर त्यांनी पू. संत गंगागिरी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. महंत रामगिरी महाराजांनी त्यांना तीर्थक्षेत्राची माहिती सांगितली.
यावेळी डॉ. भागवत यांच्या हस्ते तुळशीचे रोपण करण्यात येऊन १५० वर्षापासून सुरू असलेल्या गोशाळेतील गोमाता कालवडीचे पूजन करण्यात आले.
या ठिकाणी २०० वर्षाची अखंड परंपरा असलेली पवित्र वीणा त्यांनी धारण केली. सर कार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांच्या हस्ते स्वच्छता कर्मचारी बंधूसोबत वृक्षारोपण करण्यात आले. रा. स्व. संघ अंतर्गत ग्रामविकास गतिविधीचे मागील १५ वर्षांपासून ग्रामीण भारत समृद्ध करण्यासाठी अविरत कार्य सुरू आहे.
भारतातील ४५ प्रांतांतून ३५० जण या अभ्यास वर्गासाठी उपस्थित होते. यामध्ये ५० मातृशक्ती व ३०० पुरुष कार्यकर्ता होते. ग्रामविकास कार्याला १५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने यावर्षी हा अभ्यासवर्ग घेण्यात आला.
ग्रामविकासाच्या माध्यमातून होणारे विविध उपक्रम, प्रभात ग्राम, ग्रामविकास संस्था, मातृशक्ती, ग्राम संकूल, अक्षय कृषी परिवार इ. विषयांवर चिंतन या अभ्यास वर्गात करण्यात आले.
या अभ्यासवर्गासाठी अ.भा. कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी, अ. भा. ग्रामविकास संयोजक डॉ. दिनेश आदी प्रमुख अधिकारी उपस्थित होते.