अहमदनगर Live24 टीम, 05 नोव्हेंबर 2021 :- गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून मला बदनाम करण्याचा डाव सुरू आहे. किर्तनरुपी सेवेतून खरं बोलणं व समाजापुढे वर्तमान काळातील वस्तुस्थिती मांडणे माझ्यासारख्या प्रबोधनकाराला आता चांगलेच महागात पडत आहे.
परंतु मला कोणी कितीही बदनाम करून अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, तरी देखील समाज घडविण्यासाठी व धर्मकार्य पुढे नेण्यासाठी माझे समाज प्रबोधन कार्य सुरूच राहणार आहे. असे प्रतिपादन समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी केले .
नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात उपस्थित जनसमुदायासमोर बोलताना इंदुरीकर महाराज म्हणाले, जगद्गुरु तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांनी समाज घडवण्यासाठी आपले जीवन वेचले. पण सध्याच्या युगात गोड बोलून स्वार्थ साधणाऱ्याची संख्या वाढली आहे.
मी माझ्या किर्तन सेवेतून वर्तमानकाळ याविषयावर खरं बोलून समाजामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो आहे. अनवधानाने एखादा शब्द चुकून माझ्या वाणीतून गेला तर तोच धागा पकडून मला सोशल मीडियाद्वारे बदनाम करण्याचे काम केले जाते. दोन तासाच्या कीर्तनात मी चांगलं बोललेलं सोशल मीडियावर येत नाही याची खंत व्यक्त केली.
यावेळी इंदुरीकर महाराजांनी तरुणांना व्यसनापासून दूर रहा, गाव प्लास्टिक मुक्त करा, दररोज वृत्तपत्राचे वाचन करा, आणि गावात वाचनालय सुरु करण्याचे आवाहन केले. व्यसनाचे प्रमाण वाढले आणि उत्पन्नाचे प्रमाण कमी झाले यामुळे तरुण वेगळ्या वळणाकडे वळला असल्याचे देखिल ते म्हणाले.
देवाच्या मंदिरा इतकेच ज्ञानाच्या मंदिराला महत्त्व द्या तरच देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करु शकतो. असे म्हणत मी लस घेतली नाही घेणार नाही असं म्हणालो परंतु इतरांनी लस घेऊ नये असे मी कुठेही म्हटले नाही.
अनावधानाने एखादा शब्द चुकून वाणीतून जातो तोच धागा पकडून टीआरपी वाढवण्यासाठी मला लक्ष केले जात असल्याची खंत इंदुरीकर महाराज यांनी व्यक्त केली.