अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- ‘आपण वास्तव मांडतो, त्यामुळे टीका केली जाते. आपली विधाने चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियातून व्हायरल केली जातात.
उद्या हेच लोक म्हणतील इंदुरीकरांची नार्को चाचणी करा,’ असे म्हणत इंदुरीकरांनी पुन्हा एकदा विरोधकांना फटकारले आहे. श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी येथील एका कार्यक्रमात इंदुरीकरांनी कीर्तनातूनच आपली खंत व्यक्त केली.
ते म्हणाले, ‘आपण खरे बोलतो, समाजातील वास्तव मांडतो. त्यामुळे काही लोक माझ्या सतत मागे लागतात. माझ्या कीर्तनातील एखादे विधान सोशल मीडियातून व्हायरल केले जाते.
त्याद्वारे गैरसमज पसरविले जातात. सोशल मीडियातून त्यांच्यावर होत असलेली टीका आणि बदनामी यासंबंधी त्यांनी खेद व्यक्त केला. ही मंडळी जोडतोड करून विधान प्रसारित करीत असल्याचे ते म्हणाले.
समाजाचे किती तरी प्रश्न आहेत, समस्या आहेत, त्यांना वाचा फोडली पाहिजे. त्यातील वास्तव जनतेसमोर आणले पाहिजे. मात्र, असे होताना दिसत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.