Ahmednagar News : मी १० वर्षापुर्वी किर्तनातून सांगत होतो हुंडा प्रथा बंद होईल, लग्नाला मुली मिळणार नाही, ज्या मिळतील त्यांना हुंडा देत लग्न करवून घ्यावे लागेल. ही परिस्थिती आज आहे. आजही पुन्हा सांगतो, अजून पाच वर्षांनी खूप भयावह अवस्था होईल, तेव्हा परमार्थ करा, पैशासाठी रक्ताची नाती तोडू नका.
असे विचार हभप इंदोरीकर यांनी विचार व्यक्त केले. नगर तालुक्यातील देवगांव येथे ते एका कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले की, पालक मुलांना शाळेत घालून मोकळे होतात. परंतु शिक्षक पुर्वीसारखे जीव तोडून शिकवत नाहीत, विद्यार्थ्यांना त्यांची जबाबदारी समजत नाही.
शाळेत फळ्यावर सुविचार लिहितांना आपण नेहमी खरे बोलावे, गुरुंविषयी आदर ठेवावा, हे फक्त वाचण्यापुरते आहे, कृतीमधून ते घडत नाही. सध्या मुलांवर अध्यात्मिक संस्काराची गरज आहे. तेव्हा शाळेत सुविचार ऐवजी हरिपाठातील ओवी लिहिण्याची गरज आहे.
शिक्षक, पालक, विद्यार्थी यांची निष्क्रीयता वाढत आहे. सध्या सर्वच क्षेत्रात नितीमत्ता बदलल्याने प्रगतीऐवजी अधोगती होत चालली आहे. धर्मावर संकट आहे. तेव्हा धर्म वाचवा. धर्म वाचला तर माणसे वाचतील अन माणसे वाचली तर संप्रदाय धर्म वाढेल.