Shirdi Airport : जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तूंची व जिल्ह्याची माहिती दर्शविणारे फलक विमानतळ परिसरात उभारावेत. परिसरात भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याबरोबरच परिसरात पशुपालन करणाऱ्या पोल्ट्री फार्म चालकांना मृत्यू झालेल्या
पक्षांची विल्हेवाट लावण्याच्या सूचना द्याव्यात. याबाबत नियमितपणे तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे.
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड यांच्यावतीने शिर्डी येथील विमानतळ आणि परिसराच्या व्यवस्थापनासाठी स्थापन केलेल्या पर्यावरण व्यवस्थापन समितीची बैठक काल बुधवारी (दि.१३) जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या
अध्यक्षतेखाली शिर्डी विमानतळ येथे झाली. या बैठकीस विमानतळ संचालक मुरली कृष्णा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले की, शिर्डी येथे देशासह विदेशातून अनेक नागरिक येत असतात. या नागरिकांसाठी विमानतळ परिसरात एमटीडीसीच्या साह्याने टुरिझम हेल्प डेस्क उभारण्यात यावा.
तसेच विमानतळ परिसरामध्ये सोलर हायमास्क उभारणीसाठीचा प्रस्ताव सादर करावा. शासन नियमानुसार विमानतळाच्या निर्धारित परिसरामध्ये नवीन बांधकाम, होर्डिंग उभारणीसाठी परवानगी देताना महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाची मंजुरी घेणे आवश्यक आहे.
त्यानुसार सर्व संबंधित विभागांनी याबाबत दक्षता घ्यावी. तसेच विमानतळ परिसरापासून निर्धारित परिसर लेझर फ्री झोन आहे. शहरात व परिसरात होणाऱ्या कार्यक्रमात वापरण्यात येणाऱ्या लेझर शो साठी परवानगी देताना पोलीस विभागानेही आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सालीमठ यांनी यावेळी दिल्या.
या बैठकीस संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे, कोपरगावचे तहसीलदार संदीप भोसले, राहाताचे तालुका कृषी अधिकारी आबासाहेब ‘भोरे, कोपरगावचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, मॅनेजर एअरसाईड रोहित रेहपाडे,
परिचालन व सुरक्षा अधिकारी पंढरीनाथ शेळके, नायब तहसीलदार हेमंत पाटील, सहाय्यक वनसंरक्षक गणेश मिसाळ, वरिष्ठ प्रबंधक (वित्त व लेखा) अभिजित वासटवार यांच्यासह संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.