अहमदनगर बातम्या

भंडारदरा लाभक्षेत्राकरीता आवर्तन सोडण्याच्या सूचना : ना.राधाकृष्ण विखे पाटील

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : भंडारदरा लाभक्षेत्राकरीता सिंचन आणि बिगर सिंचनाचे ३० दिवसांचे एकत्रित आवर्तन आज गुरुवारी (दि.७) मार्च पासून सोडण्याच्या सूचना महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाला दिल्या आहेत.

या संदर्भात मंत्री विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करुन, लाभक्षेत्रात पाण्याची असलेली वाढती मागणी तसेच उन्हाची वाढलेली तिव्रता लक्षात घेवून शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तनाचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

त्यानुसार जलसंपदा विभागाने ७ मार्च ते ४ एप्रिल २०२४ पर्यंतच्या ३० दिवसांच्या आवर्तनाचे नियोजन करुन आज गुरुवार पासूनच भंडारदरा धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची मागणी आणि उन्हाची वाढलेली तिव्रता लक्षात घेवून आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे ना. विखे पाटील म्हणाले. यावर्षी पावसाचे अत्यल्प राहीलेले प्रमाण आणि धरणातील पाणी साठ्याचा विचार करुन आवर्तनाचे नियोजन करण्यात आले आहे.

या आवर्तनाचा १० हजार ३३८ हेक्टर क्षेत्राला लाभ होणार असून उन्हाची तिव्रता वाढल्याने काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्याही निर्माण झाली आहे. या आवर्तनाचा या गावांनाही लाभ व्हावा, या उद्देशाने सिंचन आणि बिगर सिंचन असे एकत्रित आवर्तन सोडण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी विभागाला दिल्या आहेत.

दरम्यान, उन्हाची वाढती तिव्रता लक्षात घेवून पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी, तसेच शेतकऱ्यांनीही पाण्याचा योग्य विनीयोग करावा, असे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले आहे.

Ahmednagarlive24 Office