अहमदनगर बातम्या

वारकऱ्यांना शासनातर्फे विमा संरक्षण- महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Published by
Ahmednagarlive24 Office

शिर्डी, दि.२२ जून (उमाका वृत्तसेवा) – पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

वारीमध्ये सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांना या निर्णयाचे विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण मिळणार आहे. महसूलमंत्री श्री. विखे पाटील यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात वारी नियोजनाच्या आढावा बैठकीत वारकरी बांधवांना विमा योजना लागू करण्याबाबत सूतोवाच केले होते.‌

याबाबत त्यांनी व्यक्तीश: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून या योजनेला मूर्त स्वरूप दिले. वारी एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांस ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल.

दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास १ लाख रुपये देण्यात येतील. अंशत: अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये तसेच वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी ३५ हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे.‌

शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबविण्यात येणार आहे. असेही महसूलमंत्री श्री.विखे पाटील यांनी सांगितले. वारीच्या दरम्यान अपघात किंवा दुर्घटना होतात आणि त्यात वारकरी जखमी होतात किंवा त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो.

यामध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी हा निर्णय घेतल्याबद्दल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

Ahmednagarlive24 Office