अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर गावात मंगळवारी दुपारच्या वेळी चोरीच्या व गळ्यातील दागिने लुटण्याच्या उद्देशाने अज्ञात चोरट्याने एका ६५ वर्षे वयाच्या वृद्धेचा गळा दाबून खून केला.
खून झालेल्या सावित्राबाई मोगल शेळके या वृद्धेच्या मृतदेहावर बुधवारी (दि. २०) दुपारी एकच्या सुमारास शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा व जबरी चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून संगमनेर तालुका पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे.
कौठे कमळेश्वर गावात सावित्राबाई मोगल शेळके या वृद्धेचा मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास घरात एकटीच असताना अज्ञात चोरट्याने चोरीच्या उद्देशाने तिच्या घरात प्रवेश करून गळा दाबून खून केला.
तिच्या अंगावरील ३० हजार रुपये किंमतीची सोन्याची मण्याची २० ग्रॅम वजनाची तीनपदरी माळ, ६ हजार रुपये किंमतीची ४ ग्रॅम वजनाची सोन्याची नथ,
एक हजार पाचशे रुपये किंमतीचे १ ग्रॅम वजनाचे कानातील कर्णफुल जोड व पाच वर्षे वयाच्या लहान मुलीच्या कानातील १ हजार ५०० रुपये किंमतीच्या १ ग्रॅम वजनाच्या कानातील सोन्याच्या बाळ्यांचा जोड लंपास केला.
या घटने प्रकरणी सनी भगवान गायकवाड (वय २७ वर्षे, रा. अंभोरे) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात आरोपीविरुद्ध रात्रीच संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा व जबरी चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला.
पोलीस अधीक्षक मनोज पाटील, श्रीरामपूर विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहून मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार अधिक तपास करीत आहेत.