Ahmednagar News : दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये झालेल्या ८१ कोटी रुपयांच्या आर्थिक अपहार प्रकरणाचा तपास संगमनेर पोलिसांकडून काढून घेण्यात आला असून हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पतसंस्थेचा अध्यक्ष भाऊसाहेब कुटे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज येथील न्यायालयात सुनावणी होणार आहे.
दूधगंगा आर्थिक अपहार प्रकरणी २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील पाच आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. उर्वरित आरोपी अद्याप फरार आहे. या गुन्ह्यांचा तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्याकडे होता
हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे द्यावा, असे पत्र पोलीस निरीक्षक मथुरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले होते. याबाबत त्वरित निर्णय घेण्यात आला असून अपहाराचा आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आलेला आहे.
दरम्यान, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पतसंस्थेचा अध्यक्ष भाऊसाहेब कुटे अटकपूर्व जामीन मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी वकिला मार्फत सत्र न्यायालयात (दि. २४) ऑगस्ट रोजी अंतरिम जामीन अर्जासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता.
या अर्जावर आज मंगळवारी सुनावणी होणार आहे.या अर्जाबाबत न्यायाधीश कोणता आदेश करतात, याकडे सभासद व ठेवीदारांचे लक्ष लागले आहे.