Ahmednagar News : स्वित्झर्लंड देशातील दावोस येथे जागतिक आर्थिक परिषद म्हणजेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमातून महाराष्ट्रासाठी एक लाख ३७ हजार कोटींची गुंतवणूक आणली आहे. महाराष्ट्रात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आल्यामुळे राज्यावर गुंतवणूकदारांचा विश्वास असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.
या परिषदेमध्ये मुकेश अंबानी, गौतम अदानी, टाटा ग्रुपचे एन चंद्रशेखरन, आदर पूनावाला, कुमार मंगलम बिर्ला, सज्जन जिंदाल, नदीर गोदरेज यांचीही उपस्थिती होती. या परिषदेला १६ जानेवारीला सुरुवात झाली होती. दाओस येथील कार्यक्रमाला अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रविराज खरमाळे यांनी हजेरी लावली होती.
आरबीके इंटरनॅशनल या कंपनीचे रविराज संचालक आहेत. त्यांचे आरबीके इंटरनॅशनल नावाने युरोप आणि आफ्रिका खंडात व्यवसाय आहेत. त्यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. आगामी काळात फूड प्रोसेसिंग संदर्भात आरबीके इंटरनॅशनल व्यवसाय विस्तार करणार आहे. अहमदनगर जिल्ह्यात आरबीके कंपनी गुंतवणूक करणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबतही रविराज खरमाळे यांची चर्चा झाली असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
जागतिक व्यापार, व्यवसाय, राजकारण, शिक्षण आणि इतर क्षेत्रातील व्यक्तींना एकत्र आणून जागतिक विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची स्थापना करण्यात आली आहे. दरवर्षी या संस्थेतर्फे स्वित्झर्लंड मधील दावोस या नयनरम्य ठिकाणी या परिषदेचे आयोजन करण्यात येते. त्यामध्ये सुमारे ३००० लोक सहभागी होत असतात. यंदा या कार्यक्रमात १५०० उद्योजक सहभागी होणार आहेत. त्यामध्ये जगातल्या सर्वात मोठ्या ६०० कंपन्यांच्या सीईओचा समावेश केला जाणार आहे.