अहमदनगर जिल्ह्यात गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक ! शेअर मार्केट व्यावसायिकाने पलायन केल्याने गुंतवणुकदारांच्या तोंडचे पाणी पळाले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील लाडजळगावसह परिसरातील अनेक गुंतवणुकदारांना चुना लावत एका शेअर मार्केट व्यावसायिकाने पलायन केल्याने गुंतवणुकदारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. संतप्त गुंतवणुकदारांनी सदर व्यावसायिकाच्या कार्यालयाची फोडतोड केली आहे.

तालुक्याच्या पूर्व भागात अनेकांनी शेअर ट्रेडिंग व्यवसायाची कार्यालये थाटली आहेत. भरघोस व्याजाच्या अभिलाषाने अनेकांनी आपले सोने, जमिनी, आदी मालमत्ता गहाण ठेवून तर काहींनी आपली मालमत्ता विकून विश्वासावर यामध्ये लाखो रुपयांची गुंतवणूक केली आहे.

गुंतवणुक करणाऱ्यांमध्ये शेतकरी, मजूर, नोकरदार, व्यापारी व राजकीय पुढाऱ्यांसह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती आहे. ५० हजारांपासून २५ लाख व त्यापुढेही शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करणारे काही जण आहेत. गत महिन्यात शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील दोन ते तीन शेअर ट्रेडिंग व्यावसायिक कोट्यवधी रुपये बुडवून पळून गेले, त्यावेळी गुंतवणुकदारांत खळबळ उडाली.

याच धास्तीने काहींनी गुंतवणूक केलेली रक्कम परत घेण्याचा तगादा सुरू केला, त्यामुळे एका शेअर ट्रेडिंग व्यावसायिकाने विषारी औषध घेतल्याची घटना घडली होती. मुद्दलही गेले आणि व्याजही गेले, तरीही याबाबत गुन्हा दाखल करण्यास कुणीच धजावत नाही, याची खंत अनेकांना सतावत असतानाच बुधवारी पहाटे पूर्व भागातील आणखी एक शेअर ट्रेडिंग व्यावसायिक अनेकांना चुना लावत पळून गेल्याने पुन्हा एकदा गुंतवणुकदारांत खळबळ उडाली आहे.

बुधवारी सकाळी सदर गावातील गुंतवणुकदारांना शेअर ट्रेडिंग घेणाऱ्या व्यक्तीच्या घरास व कार्यालयास कुलूप असल्याचे दिसताच त्यांना अंदाज आला आणि गावात कुजबुज सुरू झाली. अनेकांनी अधिक चौकशी करण्याचा प्रयत्न केला तर काहींनी ट्रेडिंगधारकास मोबाईलद्वारे संपर्क केला.

मात्र, मोबाईल बंद असल्याचे लक्षात आल्याने तो पळून गेल्याचा संशय आला. ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली, त्यामुळे गुंतवणुकदारांत संताप निर्माण झाला. या संतप्त गुंतवणुकदारांनी सदर ट्रेडिंग व्यावसायिकाच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे.