लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कामगारांचा समावेश करा : घुले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :- देशात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू करण्यात येणार आहे. सुरुवातीस आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवकांना ही लस मोफत दिली जाणार आहे.

या बरोबरच राज्यातील सर्व माथाडी कामगार, कष्टकरी, हमाल-माथाडी यांना सुद्धा यावेळेस मोफत लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी राज्य हमाल मापाडी संघटनेचे सहचिटणीस अविनाश घुले यांनी केली आहे.

याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, कामगारमंत्री दिलीप वळसे, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांना पाठवून ही मागणी केली आहे.

अत्यावश्यक सेवेमध्ये ज्याप्रमाणे डॉक्टर्स, सिस्टर, मनपा कर्मचारी, पोलिस यांचा सहभाग होतो, त्याचबरोबर यांच्या बरोबरीने राज्यातील माथाडी कामगार आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत.

हमाल-मापाडी सर्व माथाडी कामगार यांचा सुरुवातीच्या काळात अत्यावश्यक सेवेमध्ये समावेश करण्यात आला आहे. यापूर्वीही कोरोना काळात माथाडी बोर्डाच्या वतीने हमाल-माथाडी कामगारांना चार हजार रुपयांचे अनुदानही प्राप्त झाले होते. अशा कष्टकरी वर्गाला पहिल्या टप्प्यात लसीकरण मोफत केले पाहिजे, अशी मागणी घुले यांनी केली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24