अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2021 :- केडगाव बायपास चौक परिसरात जिल्हा पुरवठा विभाग व कोतवाली पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात बायोडिझेलचा साठा जप्त केला होता. याप्रकरणी सोमवारी रात्री पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.
ते सध्या पोलीस कोठडीत आहे. याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपींची संख्या वाढली आहे. या गुन्ह्यात एकूण 20 आरोपी झाले असून त्यात ‘बड्या’ व्यक्तींचा सहभाग आहे.
दरम्यान आरोपींच्या अटकेचे कारण सांगत पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी त्यांचे नावे सांगण्यास नकार दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि,
22 ऑक्टोबर 2021 रोजी पोलीस व पुरवठा विभागाने केडगाव बायपास चौकातील हॉटेल निलच्या मागील बाजूस असलेल्या पार्कींगमध्ये टाकलेल्या छाप्यात दोन टँकरमधून मालवाहू ट्रकच्या इंधनाच्या टाकीमध्ये बायोडिझेल भरले जात असल्याचे आढळून आले होते.
याप्रकरणी कोतवालीत गुन्हा दाखल आहे. सुरूवातीला दोन व नंतर सहा अशा आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आता आरोपींची संख्या 20 झाली असून बायोडिझेल प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. 12 आरोपी पसार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.