अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : मनपात आंधळं दळतंय कुत्र पीठ खातंय? बुरुडगाव डेपोतील खतनिर्मिती प्रकल्प सहा महिन्यांपासून बंद, मग पैसे चालले कुठे?

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर महापालिकेमधील विविध घटना, घडामोडी समोर येत आहेत. नुकताच शिवसेनेनं शहरातील कुत्रे पकडण्याबाबतचा मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केल्यानंतर विविध गोष्टी समोर आल्या होत्या. आता आणखी एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. बुरुडगाव कचरा डेपोतील ५० टन क्षमतेचा खतनिर्मिती प्रकल्प मागील सहा महिन्यांपासून बंद आहे अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

धक्कादायक म्हणजे दररोज प्राप्त होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया न करता कचरा थेट लॅन्डफीलवर टाकला जात असल्याचे समोर आलेय. या प्रकरणी घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख सपना वसावा यांनी ठेकेदार संस्था आदर्श कन्स्ट्रक्शनला नोटीस बजावली आहे. याबाबत ४८ तासात खुलासा करण्याचे आदेश या संस्थेला दिले आहेत.

२८ ऑगस्ट २०२३ पासून प्रकल्प कार्यान्वित पण कामकाज शून्य?

बुरुडगाव कचरा डेपोतील ५० टन क्षमतेचा खतनिर्मिती प्रकल्प उभारण्यात आला. त्यानंतर या प्रकल्पाची देखभाल, दुरुस्ती, तसेच प्रकल्प चालवण्यासाठी आदर्श कन्स्ट्रक्शन या संस्थेची नियुक्ती केली. प्रति टन १९१५ रुपये दराने १९ मे २०११ मध्ये ठेकेदार संस्थेला कार्यारंभ आदेश दिले गेले.

त्यानंतर २८ ऑगस्ट २०२३ पासून प्रकल्प कार्यान्वित करण्यात आल्याचा अहवाल तत्कालीन डेपो नियंत्रकांनी नोव्हेंबर महिन्यात सादर केला होता. परंतु जेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली त्यावेळी धक्कादायक वास्तव समोर आले. या पाहणीत डेपोचे काम बंद असल्याचे समोर आले आहे.

येथे दररोज येणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया न करता कचरा थेट लॅन्डफीलवर टाकला जात असल्याचे निदर्शनास आले. यामुळे आता विभाग प्रमुखांनी ठेकेदार संस्थेला नोटीस बजावली आहे. हा प्रकार गैरजबाबदारपणाचा व निविदेच्या अटी, शर्तीचा भंग करणारा असल्याने याबाबत ४८ तासांच्या लेखी खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office