Ahmednagar News : कर्जत तालुक्यात वाळूउपसा मोठ्या प्रमाणात सुरू असताना त्याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याऐवजी स्वतःची शेती विकसित करणाऱ्या शेतकऱ्यावर तत्परतेने कारवाई करण्याचा प्रकार उघडकीस आला असून, महसूल विभाग चोर सोडून संन्यासाला फाशी,
या पद्धतीने कारवाई करत असल्याचा गंभीर आरोप कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर यांनी केला आहे.
तालुक्यातील कोंभळी जवळ नवनाथ रामभाऊ गांगर्डे हे शेतकरी आपल्या शेतातील मुरूम उचलून आपल्याच शेतात टाकत होते. फळबाग लावण्यासाठी, या शेतकऱ्याने प्रकरण केले असून, आपल्या पडीक जमिनीत सुधारणा करत असताना महसूलच्या जिल्हा गौणखनिज पथकाने या शेतकऱ्यावर कारवाई करत एक जेसीबी, चार ट्रॅक्टर जप्त करून कर्जत तहसील कार्यालयात जमा केले.
श्रीरामपूर उपविभागाच्या या पथकात मंडळ अधिकारी ए. एम. खटावकर यांच्यासह तलाठी अमोल शिरसाठ व तलाठी एम. टी. शहाणे तसेच पोलीस ए. एम. गायकवाड व वाहनचालक हे सहभागी झाले होते. शेतकऱ्यावरील या कारवाईमुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले व त्यांनी या पथकाबरोबर तहसील कार्यालय गाठले.
या वेळी नवनाथ गांगर्डे या शेतकऱ्याने माहिती देताना आपल्या पोट खराब असलेल्या जमिनीला नीट करून तेथे फळबाग लागवड करण्यासाठी प्रकरण केले असून, स्वतः ची जमीन नीट करत असताना हे अधिकारी आले व आम्हाला दमदाटी करून आमचे मोबाईल हिसकावून घेतले, असा आरोप केला आम्ही आमच्या शेतीला नीट करायचे का नाही, शासन शेतकऱ्यांना जगू देणार आहे का नाही, आमच्या पुढे काय पर्याय आहे, मी आत्महत्या करू का, असे म्हणत खिशातून औषधाची बाटली काढली.
आम्ही चोर नाहीत फक्त आम्हाला जगू द्या, असे म्हटले. राज्यात शिंदे व फडणवीस सरकार शेतकऱ्यांप्रती संवेदनशिल असताना व शासन आपल्या दारी, ही योजना राबवली जात असताना प्रशासन मात्र हेतू पुरस्सर शेतकऱ्यावर कारवाई करत आहे, ही कारवाई अत्यंत अन्यायकारक आहे, असे मत भाजपचे तालुका सरचिटणीस शेखर खरमरे यांनी या वेळी व्यक्त केले.