रोहित पवारांच्या मतदारसंघातील नागरिकांना पिण्याचे पाणी विकत घेण्याची नामुष्की

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- जामखेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भूतवडा तलावात अत्यल्प पाणीसाठा असल्याने 15 दिवसातून एकदा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे जामखेडकरांवर अक्षरश: पिण्याचे पाणी विकत घेण्याची नामुष्की ओढावली आहे.

यंदा मात्र मे महिना अर्धा संपत आला तरी जामखेड शहरासाठी टॅंकर सुरु झाले नाहीत. पहिल्यांदाच मे महिना टॅंकरविना ही परिस्थिती पहायला मिळत आहे. सध्या जगभरात करोनाने संकट उभे केले आहे.

या करोना महायुद्धात जामखेड शहरासह तालुक्‍यातील अनेक गावातील नागरिकांना करोनासोबतच पाणीटंचाईला देखील तोंड द्यावे लागत आहे. जामखेड शहरासाठी उजणी धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचे फक्‍त आश्‍वासन देण्यात येते.

मात्र, ही योजना प्रत्यक्षात येत नसल्याने तालुक्‍यात 27 ठिकाणी आठ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. शहरात 15 दिवसातून एकदा एक तास पाणी मिळत आहे. प्रतिदिन प्रतिमानसी 30 लिटर पाणी मिळणे हे फक्त कागदावरच आहे.

उजणी धरणातील पाणीपुरवठा योजना शहरवासीयांसाठी मृगजळ ठरत आहे. सध्या तालुक्‍यातील अनेक गावे वाड्या वस्तींसह शहरातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भुतवडा तलावातील पाणीसाठा मृत साठ्यात आहे. तालुक्‍यात 8 टॅंकरद्वारे 27 ठिकाणी पाणीपुरवठा होत आहे.

यात अरणगाव, पिंपरखेड, हासनाबाद, पाटोदा, फक्राबाद, धानोरा, डोणगाव, हळगाव, बावी या गावांसह 27 ठिकाणी आठ टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे.

तसेच सारोळा व शिऊर या ठिकाणी नवीन प्रस्ताव दाखल झाले आहेत. गेल्या वर्षी तालुक्‍यातील ग्रामीण भागात 58 टॅंकरने पाणीपुरवठा होत होता. तर शहरासाठी 34 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत होता.

मात्र यावर्षी टॅंकरचा आकडा निम्म्यावरच आला आहे. नगरपालिकेने बटेवाडी, जमादारवाडी, लेहनेवाडी, चुंबळी, जांबवाडी, भुतवडा व धोत्री या ठिकाणी टॅंकरव्दारे पाणीपुरवठा होत आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24