अहमदनगर बातम्या

Ahmednagar News :शेतीमालाला शाश्वत बाजारभाव मिळणे गरजेचे

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : बदलत्या काळानुसार पारंपरिक पद्धतीने केली जाणारी शेती आता आधुनिक पद्धतीने केली जात असून, शेतमाल उत्पादित करण्यात शेतकरी सक्षम होत आहेत ; परंतु शाश्वत बाजारभाव मिळण्याची कोणतीही हमी नसल्यामुळे शेती व्यवसाय करण्यासाठी आजचे तरुण धजावत नाहीत, असे मत कांदा उत्पादक शेतकरी क्रांती संघटनेचे सदस्य सचिन उगले यांनी व्यक्त केले आहे.

वाढत्या महागाईमुळे सर्वच प्रकारच्या शेतमालाचा उत्पादन खर्च वाढत चालला आहे; परंतु आपल्या राज्यात व देशात आता असलेली प्रचलित शेतमाल विक्री व्यवस्था ही शेतकऱ्यांना त्याच्या शेतमालाचे बाजारभाव ठरवण्याचे स्वातंत्र्य देत नाही.

राज्यातील व देशातील बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना उत्पादित केलेल्या शेतमाल विक्रीसाठी घेऊन जावा लागतो, तेथे लिलाव पद्धतीने आडते, व्यापारी शेतमाल खरेदी करतात; परंतु ही विक्री व्यवस्था पुर्णपणे परावलंबी असून,

त्यामध्ये शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे स्वतःच्या शेतमालाचे दर ठरवण्याचे अधिकार नाहीत, त्यामुळे अनेकदा शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळूनही आपला शेतमाल हा नाईलाजाने विक्री करावा लागतो.

शेतीत नवनवीन तंत्रज्ञान, यंत्रे, अवजारे, यामुळे आधुनिक पद्धतीने शेती करणे शेतकऱ्यांना सोपे झाले असले तरी उत्पादन खर्चही वाढला असून, खते औषधे बियाणे, मजुरी वाढली आहे तसेच अवकाळी पाऊस, गारपीट, अतिवृष्टी व दुष्काळ, अशा नैसर्गिक संकटांचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतो.

शाश्वत बाजारभाव मिळत नसल्याने शेती व्यवसायामध्ये हमखास नफा मिळेल, याची कोणतीही खात्री नाही, त्यामुळे आजच्या शेतकरी कुटुंबातील तरुण मुले, मुली शेती व्यवसायात उतरण्यासाठी तयारी दाखवत नाहीत. देशाला शेतमाल उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण व्हायचे असेल

तर सरकारने प्रत्येक पिकाच्या उत्पादन खर्चावर आधारित नफ्यासह शाश्वत बाजारभाव मिळवून देण्याचे धोरण तयार करण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. तरच पदव्या घेतलेले तरुण शेती व्यवसायायाकडे वळतील अन्यथा कृषी प्रधानदेश अशी ओळख असलेल्या आपल्या देशाला शेतमाल आयातीवर अवलंबून राहावे लागेल, असेही मत उगले यांनी व्यक्त केले.

Ahmednagarlive24 Office