अहमदनगर बातम्या

ऊसतोड मजुरांची लक्षवेधी नोंदणी होणे गरजेचे !

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : जिल्ह्यासह महाराष्ट्रात जेवढे साखर कारखाने आहेत, त्या कारखान्यासाठी प्रत्येक वर्षी ऊस तोडणीसाठी ऊसतोड मजूर जाऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात. त्या सर्वच ऊसतोड मजुरांची लक्षवेधी नोंदणी होणे गरजेचे असल्याचे मत महाराष्ट्र राज्य ऊसतोड वाहतूक कामगार व मुकादम संघटनेच्या प्रदेश जनरल सेक्रेटरी प्रा. सुशीलाताई मोराळे यांनी व्यक्त केले आहे.

शेवगाव तालुक्यातील संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे श्री केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या श्री केदारेश्वर मंदिरात आयोजित विशेष सर्वसाधारण सभेत त्या बोलत होत्या. पुढे म्हणाल्या की, साखर कारखानदारीचा व्यवसाय महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात असून त्यामध्ये निसर्गाच्या साथीने कधी चढउतार होत असताना दिसून येत आहे.

कारखाना निर्मितीपासून बीडसह अहमदनगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त मजूर ऊसतोड करण्यासाठी वेगवेगळ्या कारखान्यावर जातात. मात्र जाणाऱ्या त्या सर्व मजुरांची दप्तरी नोंद नसल्याने त्यांना शासनाच्या विविध योजनेसह कारखान्याकडून ज्या गोष्टी मिळणे आवश्यक आहे त्या मिळत नसल्याने त्यांना वंचित राहावे लागत आहे.

यासाठी कारखान्याच्या मुकादमाने पुढे येऊन आपण घेऊन जात असलेल्या ऊसतोड मजुरांच्या नोंदीचे दायित्व स्वीकारणे गरजेचे असल्याचे सांगून बीड जिल्ह्यात जवळपास ५ लाख मजुरांची संख्या असताना त्या ठिकाणी फक्त १ लाख ७५ हजारच मजूर नोंदलेले असल्याचे म्हटले.

१९८६ साली स्थापन केलेल्या या संघटनेच्या माध्यमातून ऊसतोड मजुरांसह वाहतूक कामगार व मुकादम यांच्या ज्वलंत प्रश्नासाठी संघटनेच्या वतीने कायम पुढाकार घेतला असल्याचे प्रा. मोराळे यांनी म्हटले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office