जनतेला वेळेत सुविधा उपलब्ध करून देणे शासनाचे काम आहे – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाला नसल्याने टंचाईची परिस्थिती आहे. टंचाईत पिण्याचे पाणी व चारा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर काम करावे. पदाधिकाऱ्यांनी केवळ तक्रारी न करता समन्वय साधून सामान्य माणसाला न्याय मिळवून द्यावा, असे प्रतिपादन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

येथील संगमनेर तालुका टंचाई आढावा बैठक काल बुधवारी महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, संगमनेर उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार धीरज मांजरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराडे, गटविकास अधिकारी अनिल नागणे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, नितीन दिनकर, श्रीराम गणपुले, अमोल खताळ, आबासाहेब थोरात, सोमनाथ कानकाटे आदी उपस्थित होते.

यावेळी संगमनेर गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी संगमनेर पाणी टंचाईचे सादरीकरण केले. संगमनेर मध्ये २० सप्टेंबर पर्यंत ३९ टक्के पर्यंत १३७ मिलीमीटर पाऊस पडला आहे. ४७ टंचाई गावापैकी २१ गावांत २५ हजार ७७४ व्यक्तींसाठी पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, संगमनेर मध्ये ३८ टक्के पाऊस झाला आहे. आपल्यासमोर पिण्याच्या पाण्याचे आवाहन आहे. धरणातील पाणी आपण पिण्यासाठी राखून ठेवले आहे. भीषण टंचाईला आपण सामोरे जात आहोत. माणसासोबत जनावराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आपल्याला सोडवावा लागणार आहे. चारा उत्पादनाचा आपल्यापुढे प्रश्न आहे. चारा निर्मिती करण्यास आपण प्राधान्य देत आहोत.

शेतकऱ्यांनी चारा उत्पादन करावे. शेतकऱ्यांना ६ रूपये किलोने मूरघास उत्पादन केले जाणार आहे. तहसीलदार किंवा गटविकास अधिकारी यांच्या अहवालावर गावांना टँकरने पुरवठा करण्यात येईल. विहिरीत पाणी न टाकता पाण्याच्या टाकीतूनच पाण्याचा पुरवठा करावा. चारा मागणी असेल ती नोंदवावी, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

गावकऱ्यांची मागणी आल्यापासून पाच दिवसांत टँकर सुरू झाला पाहिजे. जीवन प्राधिकरणाच्या सर्व योजना कार्यान्वित करावे. टँकरचे वेळापत्रक तयार करावे. ग्रामसेवक व तलाठ्यांनी हजर राहिले पाहिजे. जनतेला वेळेत सुविधा उपलब्ध करून देणे शासनाचे काम आहे.

शासनाच्या धोरणाची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी, अशा सूचनाही पालकमंत्री विखे पाटील यांनी यावेळी दिल्या. पठार भागात प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी व तहसीलदारांनी पाहणी दौरे करावेत. पठार भागाचा स्वतः दौरा करून समस्या समजून घेणार असल्याचे मंत्री विखे यांनी सांगितले.