Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील एका गावात अतिशय निंदनीय प्रकार उघडकीस आला आहे. एका पाच वर्षीय बालिकेला तिच्या घरातून उचलून नेऊन, तिच्यावर अत्याचार करून तिचा गळा आवळून तिला मारण्याचा प्रयत्न केल्याची अत्यंत घृणास्पद घटना घडली आहे.
याबाबतअधिक माहिती अशी, की राहुरी तालुक्यातील एका पाच वर्षीय बालिकेचे आई- वडील बाहेर गेले होते. त्या संधीचा फायदा घेऊन किशोर ऊर्फ केश्या विजय पवार याने तिच्या घरातून उचलून नेले. नारळाच्या झाडाजवळील एका शेताच्या बांधाजवळ त्याने त्या मुलीवर अत्याचार केला.
त्यानंतर तिचा कापडाच्या सहाय्याने गळा आवळून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी घरातून बेपत्ता झालेल्या मुलीचा शोध घेत असलेल्या तिच्या आईने ही घटना पाहिली. तिने ताबडतोब त्या आरोपीला जागेवरच पकडून आरडाओरड केली.
पीडित बालिकेचे वडिल येत असल्याचे पाहून आरोपी त्यांना ढकलून घटनास्थळावरून पसार झाला. नशीब बलवत्तर म्हणून त्या मुलीचा जीव वाचला. घटनेनंतर त्या चिमुकलीला अहमदनगर येथे जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन गजाआड केले आहे.