अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- कोवीडच्या टेस्ट वाढवा, शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम वाटप करा, कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करा. प्रधानमंत्री आवास योजनेची कामे चालू करा व मार्गी लावा.
असे आदेश संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना देवुन कामात कसुर केला तर कारवाईला तयार रहा असे आदेश देत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांची चांगलीच कानउघणी केली.
यावेळी डॉ.भोसले म्हणाले, राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या खूप तक्रारी आहेत. खड्डे बुजविण्याच्या जबाबदारी ठेकेदाराची आहे. रस्त्याच्या कामाला गती मिळावी त्यासाठी सूचना दिल्या आहेत.
शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान तातडीने द्यावे. कोवीड१९ ची लाट पुन्हा येतेय त्यासाठी खबरदारी घ्यावी. तपासण्या वाढवा. प्रधानमंत्री आवास योजनेचे कामही गतीने करावे.
आमदार मोनिका राजळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने पुर्ण करण्याची मागणी केली. काम कोणीही करीत असले तरी जनतेचा रोष लोकप्रतिनिधीकडे येत आहे.
रस्ता अपूर्ण असल्याने अनेकांचा अपघातामधे बळी गेला आहे. जनभावना लक्षात घेवुन काम तातडीने पुर्ण करावे अशी मागणी राजळेंनी केल्यानंतर भोसले
यांनी ऱाष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व ठेकेदाराचे प्रतिनिधींना कडक शब्दात समज दिली. पाथर्डी तालुक्यातील तहसील कार्यालयात तालुक्यातील विविध कामाचा जिल्हाधिकारी भोसले यांनी आढावा घेतला. यावेळी सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.