Ahmednagar News : बोधेगाव बोधेगाव परिसर आणि शेतीचा विकास साधण्यासाठी या भागात शाश्वत पाणी आणणे आवश्यक आहे. या भागातील गावांना जायकवाडी धरणाचे पाणी मिळवून देण्यासाठी माझे आजोबा माजी केंद्रीयमंत्री बबनराव ढाकणे यांनी १९८० च्या सुमारास पाटफोडो – आंदोलन केले.
त्यांचा आदर्श आणि वडील प्रताप ढाकणे यांच्या संघर्षाचा वारसा घेऊन शेतकऱ्यांसह आगामी काळात पाटपाण्यासाठी मोठा लढा उभारणार असल्याचे प्रतिपादन केदारेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष – ऋषिकेश ढाकणे यांनी केले.
बोधेगाव (ता. शेवगाव) येथील केदारेश्वर कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या ३४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
वार्षिक सभेत केदारेश्वरच्या मालकीची हक्काची पाणी योजना, सरकारी नोकरीत कंत्राटी पद्धतीने भरतीला विरोध व राज्यातील शासकीय शाळांची दत्तक योजना रद्द करावी यासाठी सर्वानुमते ठराव मंजूरकरण्यात आले. सूत्रसंचालन शरद सोनवणे यांनी केले. डॉ. प्रकाश घनवट यांनी आभार मानले.
जायकवाडी एक्स्प्रेस कालवा ही मूळ संकल्पना माजी केंद्रीयमंत्री बबनराव ढाकणे यांची होती. परंतु ती रद्द झाल्याने ताजनापूर लिष्टला मंजुरी मिळाली. पाण्यासाठी आम्ही भीक मागत नसून, हक्क मागत असल्याचे सांगत कामगारांच्या भविष्यासाठी पुढच्या गळीत हंगामाला वेतन आयोग लागू करणार असल्याचे केदारेश्वरचे माजी अध्यक्ष अॅड. प्रताप ढाकणे यांनी आश्वासन दिले.