अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच बिबट्याने पुन्हा एकदा धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे.
कर्जत तालुक्यात बिबट्याने कालवड, बैल, मेंढ्या शेळ्यांवर हल्ला करून त्यांना ठार केले आहे. त्यामुळे शेतकर्यांसह पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्यामुळे कधी एकदाचा बिबट्या पिंजर्यात जेरबंद होईल याकडे शेतकर्यांचे लक्ष लागून आहे. दरम्यान बिबट्याकडून मानवीवस्तीवर होणारे हल्ले लक्षात घेता वनविभाग देखील युद्धपातळीवर काम करत आहे.
कर्जत तालुक्यातील धालवडी येथील शंकर बाळू पवार व संदीप तुकाराम होळकर यांनी ऊसाच्या शेतात बिबट्या आढळल्याची माहिती वनविभागाला दिली. त्यानुसार दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास वनविभागाचे कर्मचारी धालवडी येथे गेले. ऊसात बिबट्या असल्याचे नागरिकांचे म्हणणे होते.
उसाचे मोठे क्षेत्र असल्याने बिबट्याचा शोध घेणे कर्मचाऱ्यांना अडचणीचे झाले. त्यामुळे उभ्या ऊसात जेसीबी घालून बिबट्याचा शोध घेण्यात आला. ऊसाच्या बाजूने मोठ्या संख्येने शेतकरी काठ्या घेवून उभे होते. मात्र जेसीबीने शोधाशोध घेऊनही बिबट्या आढळून आला नाही, अशी माहिती वनसंरक्षक रविंद्र कोळी यांनी दिली.