अहमदनगर च्या शेतकऱ्याचा जुगाड राज्यात सुपरहिट ! मोटारसायकलचा बनविला मिनी ट्रॅक्टर !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : शेतकामासाठी व आंतर मशागतीची कामे करण्यासाठी औजारांची जागा यंत्रांनी घेतली आहे. आता त्यातही शेतकरी आपल्या पद्धतीने बदल करून घेत आहेत. असाच एक जुगाड राहाता तालुक्यातील गोंडेगाव येथील प्रगतशील शेतकरी पुंडलिक बळवंत भवार यांनी केला आहे. त्यांनी त्यांच्या जुन्या मोटारसायकलला चक्क मिनी ट्रॅक्टरचा भाग जोडून तीनचाकी जुगाड बनवला आहे. या जुगाडाची चांगलीच चर्चा परिसरात होत आहे.

भवार यांनी त्यांच्या राजदूत कंपनीच्या १२५ सी.सी. इंजीन क्षमता असलेल्या मोटारसायकलला मिनी ट्रॅक्टरसारखे मॉडिफाईड करून तिला पाच फनी कोळपे बसवले आहे. मोटारसायकल मध्ये बरेच बदल करून शेतीमधील पिकांची आंतर मशागतीची कामे करण्यासाठी उपयोगी पडेल, असे तीनचाकावर चालणारे ट्रॅक्टर कम देशी जुगाड तयार केले आहे.

या जुगाडाचा उपयोग शेतकऱ्यांना होत आहे. जुगाडाला पाच फनी कोळपे असल्याने मका, सोयाबीन, कापूस अशा पिकांतील अंतर्गत मशागतीची कामे करण्यासाठी हे जुगाड अतिशय उपयुक्त ठरत आहे. या जुगाडाला प्रतिएकरी एक ते दोन लिटर पेट्रोल लागते, तसेच एक ते दोन तासात एक एकराची कोळपणी करण्यासाठी हे जुगाड़ सक्षम आहे.

एकरी एक हजार रुपये भाव असल्याने हे जुगाड़ शेतकऱ्याच्या पसंतीस उतरले आहे.देशी जुगाड बनविण्यासाठी भवार यांना तब्बल ४० ते ५० हजार रुपये खर्च आला असून, तीन वर्षांपासून या जुगाडाच्या माध्यमातून आतापर्यंत त्यांनी जळगाव, गोंडेगाव परिसरात हजारो एकर क्षेत्राची कोळपणी व आंतर मशागतीची कामे केली आहेत. त्यांनी बनवलेले जुगाड़ हलक्या वजनाचे असून यामुळे शेतातील पिके तुडवली जात जात नाहीत.

मजुरांच्या साह्याने खुरपणी, कोळपणी, तसेच इतर आंतरमशागतीची कामे करण्यासाठी येणारा खर्च खिशाला मोठी कात्री लावणारा आहे. या जुगाडामुळे पिकांमधील तण तर निघतेच त्यासोबत पिकांना माती लागली जाते.

यामुळे पिके सुदृद होतात. सध्या मजुरांना ३०० ते ४०० रुपये रोजंदारी देऊन, किंवा एकरी तीन ते साडेतीन हजार रुपये देऊन मजुरांच्या टोळीद्वारे खुरपणी करावी लागते. यात वेळ तर जातोच; परंतु काम जलद गतीने होत नाही. म्हणून शेतकरी जुगाडाच्या वापराकडे वळू लागले आहेत.

कुठून आली संकल्पना..

यू ट्यूबवर जुगाड बनविण्याचे व्हीडीओ पाहून जुगाड बनविण्याची संकल्पना पुंडलिक भवार यांच्या मनात आली. यासाठी त्यांनी आपल्याकडे असलेली १२५ सीसी इंजीन क्षमता असलेली राजदूत कंपनीची मोटारसायकल वापरली.