अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- शेतात भरघोस पीक घेण्यासाठीं रात्रंदिवस काम करणारा बळीराजा शेतात राबताना आपण नेहमीच बघतो. मात्र याच बळीराजाला मोलाची साथ देणारा त्याचा हक्काचा साथीदार म्हणजे बैल होय.
न थकता न थांबता आपल्या मालकाला साथ देत काळ्या मातीत सोन पिकवण्याची जिम्मेदारी आपल्या खांद्यावर घेतलेल्या शेतकऱ्याच्या या साथीदाराची काळजी घेणे हे देखील तितकेच महत्वाचे असते.
वर्षातून एकदा साजरा होणारा बैलपोळा हे त्यांच्या मानाचा, सन्मानाचा दिवस. आजही आपल्या शेतीचा आधार असलेल्या बैलांवर जीवापाड प्रेम कऱणाऱ्या एका शेतकऱ्याने बैलांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करुन
त्यांच्याप्रती आपल्या संवेदना प्रकट केल्या. संगमनेर तालुक्यातील रणखांब येथील सूर्यभान कोंडाजी शेजवळ या शेतकऱ्याने शेतीसाठी शक्ती व शिवा या नावाचे उमदे बैल जोपासले आहेत.
शेतीच्या यांत्रिकीकरणाच्या काळात अद्याप ग्रामीण भागात बैलांवर आधारित शेती केली जाते. शेती व्यवसायावर आपल्या कुटूंबाच्या प्रगतीत आपल्या लाडक्या बैलजोडीचा सिंहाचा वाटा असल्याच्या
भावनेतून त्यांनी बैलांचा कुटुंबातील सदस्य समजून त्यांचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला. त्यासाठी केकही आणला होता. या वेळी त्यांनी त्यांच्या राहत्या घरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली होती.
तसेच पोळा सणाप्रमाणे आपल्या बैलजोडीचा साज शृंगारही केला होता. वाद्यांच्या गजरात व पाहुणे रावळ्यांसह ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा केला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved