नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यावरील ८ दरवाजांचा पुर्वानुभव पहाता नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्याचे नव्याने टाकण्यात येणारे १० वक्राकार दरवाजे हे गोदावरी कालव्यांना शाप ठरणार असल्याने आ. आशुतोष काळे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दोन वेगवेगळ्या दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कडाडून विरोध केला आहे.
जलसंपदा विभाग नवीन १० दरवाजे बांधण्यासाठी निविदा काढून जी तत्परता दाखवली जात आहे, असा दावा आमदार आशुतोष काळे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केला आहे. याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जलसंपदा विभागाची ही तत्परता गोदावरी कालवे लाभधारकांसाठी अन्यायकारक असून हा निर्णय घेऊन जखमेवर मीठ चोळण्यात येत आहे, अशी लाभधारकांची भावना आहे, असे काळे-कोल्हे यांनी म्हटले आहे.
पूरस्थितीने बाधित होणाऱ्या गोदाकाठच्या गावांसाठी राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने नांदूर मध्यमेश्वर धरणावर नदीच्या तळालगत नव्याने वाढीव १२ मीटर बाय ८ मीटर आकाराचे १० वक्राकार दरवाजे बांधण्यास मान्यता दिली असून या निर्णयाला न्यायालयात आव्हान देणार आहे.
हा निर्णय गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रावर अन्याय करणारा असून त्या विरोधात न्यायालयीन लढाई बरोबरच राजकीय लढाई देखील लढू, असा इशारा आ. आशुतोष काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
निफाड परिसरातील गावांना पावसाळ्यात पुराचा धोका पोहोचतो हे कारण पुढे करत नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यास जास्तीचे वक्राकार दरवाजे बसवावे, अशी निफाडकरांनी केलेली मागणीच शास्त्रोक्त नाही. परिणामी, गोदावरी डावा आणि उजव्या कालव्यावरील शेतकऱ्यांच्या शेतीस पाणीच मिळणार नाही.
तेंव्हा या बंधाऱ्यास १० वक्राकार दरवाजे बसवू नये, अशी मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
बारमाही ब्लॉकच्या नावाखाली लँड सिलींग कायद्यान्वये जास्तीच्या जमिनी गेल्या व ५० टक्के ब्लॉक्स देखील रद्द करून गोदावरी कालव्यांच्या लाभधारक शेतकऱ्यांवर दुहेरी अन्याय झाला असताना पुन्हा तिहेरी अन्याय सहन करण्याची क्षमता गोदावरी कालव्याच्या लाभधारक शेतकऱ्यांची राहिलेली नाही. त्यामुळे लाभधारक शेतकऱ्यांसाठी न्यायालयीन लढाई तर लढतच आहे. परंतु त्याचबरोबर राजकीय लढाई देखील लढणार आहे. -आ. आशुतोष काळे, आमदार.
वाढत्या बिगरसिंचन पाण्यामुळे गोदावरी कालव्यांना सध्याच पाटपाण्याचे आर्वतन नीट होत नाही, टेलसह वरच्या भागातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांना पाणीच मिळत नाही. समन्यायी पाणी वाटपाच्या कायद्यामुळे बारमाही गोदावरी कालवे लाभधारक शेतकरी, फळबागा, शेती पिके उध्दवस्त झाली आहे.
तंत्रज्ञान प्रगत झालेले असताना अगोदर त्याचा वापर करा आणि नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यास १० वक्राकार दरवाजे बसविण्याचा घाट तात्काळ बंद करावा.- स्नेहलता कोल्हे, माजी आमदार.