कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यासह भंडारदऱ्याचा परिसर पर्यटकांनी गजबजला !

Pragati
Published:
bhandardara

पर्यटनाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या भंडारदऱ्याला वीक एंडच्या सुट्टीचे औचित्य साधत हजारो पर्यटकांनी भेट दिली असून भंडारदऱ्याच्या परिसरातील कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य पर्यटकांनी गजबजलेले दिसून आले. तर भंडारदरा धरणाचा पाणीसाठा संततधार पाऊस सुरू असल्याने चार टीएमसीच्या पुढे गेला आहे.

अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसर निसर्ग पर्यटनासाठी ओळखला जातो. त्यातच पुणे जिल्ह्यातील पर्यटन बंद असल्याने भंडारदऱ्याला पर्यटकांची जत्रा भरलेली दिसून येत असल्याने भंडारदरा पर्यटकांच्या गर्दीने हाउसफुल दिसून आला.

शुक्रवारी मध्यरात्रीपासून भंडारदरा धरणाच्या पाणलोटासह परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे परिसरातील सर्व धबधबे ओसंडून वाहताना दिसुन येत आहेत. शनिवार व रविवार सलग दोन दिवस विकएंडची सुट्टी आली होती.

त्यातच मुंबई आणि नाशिक येथील पर्यटकांना भंडारदरा हा अतिशय जवळच्या मार्गावर आहे. तर पुणे जिल्ह्यातील पर्यटन बंद असल्याने त्याही भागातील पर्यटक भंडारदऱ्याला भेट देत असल्याचे दिसून आले. भंडारदऱ्याच्या रिंग रोडवर असणाऱ्या वसुंधरा या धबधब्यावर पर्यटकांची सर्वात जास्त गर्दी दिसून
आली.

या ठिकाणी असणारा जलप्रपात पर्यटकांनी आपल्या डोळ्यांमध्ये सामावुन घेतानाच ओले चिब होण्याचा आनंद देखील घेतला. अनेक पर्यटक हे पूर्णपणे रिंग रोडचे पर्यटन करताना दिसुन आले. भंडारदऱ्याच्या पर्यटनामध्ये पावसाळ्यात कांदा भजी व व मक्याच्या कणसांचा पर्यटक मनमुराद आनंद घेत होती.

नान्ही फॉल खाली भिजण्याचा पर्यटकांनी मनमुरात आनंद घेतला. या संपूर्ण पर्यटनावर भंडारदऱ्याच्या वन्यजीव विभागाकडून नियंत्रण ठेवण्यात आले होते. यावेळी रिंग रोडला एक दोन ठिकाणी गाड्यांचा अपघात झालेला दिसून आला.

भंडारदरा धरणाच्या पाणलोटासह परिसरामध्ये पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे भंडारदरा धरणामध्ये नवीन पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू असल्याने भंडारदरा धरण चार टीएमसीच्या पुढे भरले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ४३८९ दलघफु झाला होता.

गत २४ तासांमध्ये भंडारदरा येथे २७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर घाटघर येथे ८९ मिलिमीटर पाऊस पडला असून रतनवाडी येथे ८२ मिलिमीटर तर पांजरे ७७ येथे पाऊस मोजला गेला. रविवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत भंडारदरा धरण ३९.७६ टक्के भरले होते.

कळसुबाई शिखरावरही पाऊस सुरू असल्याने वाकी धरणावरुन १९७ क्युसेकने पाणी कृष्णावंती नदीमध्ये सोडण्यात आले असून निळवंडे धरणाचा पाणीसाठा १४३८ दलघफु झाला आहे. भंडारदरा धरणाच्या परिसरामध्ये संध्याकाळच्या सुमारास काही प्रमाणात पाऊस थांबलेला दिसून आला असून सर्वत्र ढगाळ वातावरण होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe