अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:-जेऊर जिल्हा परिषद गट माजी आमदार कर्डिले यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. कर्डिले यांनी हा बालेकिल्ला राखल्याचे चित्र झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत दिसून आले आहे.
जिल्हा परिषद गटात आज झालेल्या सरपंच निवडीत डोंगरगण व इमामपूर वगळता सर्वच गावात कर्डिले गटाचा सरपंच झाल्याचे पाहावयास मिळत आहे. अवघ्या दोन जागा वगळता इतर सर्व ठिकाणी भाजपचे माजी आमदार कर्डिले गटाचे सरपंच झाले आहेत. मंगळवार दि. ९ रोजी सरपंचाची निवड करण्यात आली.
जेऊर येथे राजश्री अण्णासाहेब मगर यांची सरपंच पदी तर श्रीतेश चंद्रकांत पवार यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली आहे. सरपंच पदासाठी ज्योती तोडमल यांनी भरलेला अर्ज माघारी घेतल्याने हि निवड बिनविरोध झाली. पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कर्डिले गटाचे आठ सदस्य निवडून आले होते.
त्या विरोधात निवडून आलेल्या नऊ सदस्यांपैकी आठ सदस्य कर्डिले गटात दाखल झाले त्यामुळे कर्डिले गटाचे संख्याबळ 16 झाले होते. अपक्ष ग्रामपंचायत सदस्य योगेश पाटोळे यांनी सरपंच पदाची निवड होताच आपल्या ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने हा चर्चेचा विषय ठरला.
धनगरवाडी येथे अनुसूचित जमाती महिला या प्रवर्गासाठी सरपंच पद राखीव झाले आहे. परंतु या प्रवर्गातील उमेदवार नसल्याने सरपंच पद रिक्तच राहिले. उपसरपंच पदासाठी मनिषा गायके व अशोक विरकर यांच्यात मतदान झाले. दोघांनाही समसमान चार मते मिळाल्याने यावेळी चिठ्ठी काढण्यात आली.
त्यामध्ये मनीषा गायके यांची उपसरपंच पदी निवड झाली आहे. खोसपुरी येथे नसीबाबी पठाण व शोभा भिसे यांच्यात सरपंच पदासाठी मतदान झाले. नसीबाबी पठाण यांना पाच मते तर शोभा भिसे यांना तीन मते मिळाली. नसीबाबी पठाण यांची सरपंच म्हणून निवड झाली
तर उपसरपंच पदासाठी मीना भालेराव व आसाराम वाघमोडे यांच्यात मतदान झाले येथे मीना भालेराव यांची उपसरपंच पदी निवड झाली. देवगाव येथे कविता वामन व मनीषा वामन यांच्यात सरपंच पदासाठी मतदान झाले. कविता वामन यांना चार तर मनिषा वामन यांना तीन मते मिळाली.
कविता वामन यांची सरपंच पदी निवड झाली आहे तर हरिदास खळे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली आहे. बहिरवाडी येथे सौ.अंजना येवले यांची सरपंच पदी तर मधुकर पाटोळे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली आहे. पिंपळगाव माळवी येथे राधिका प्रभुणे यांची सरपंच पदी बिनविरोध निवड झाली
तर भारती बनकर यांची उपसरपंच पदी झालेल्या मतदानातून निवड झाली. ऊदरमल येथे योसेफ भिंगारदिवे यांची सरपंच पदी बिनविरोध निवड झाली तर नवनाथ पालवे यांची उपसरपंच पदी निवड झाली आहे. ऊदरमल येथे एका गटाचे सहा सदस्य निवडून आले होते विरोधी गटातून एकमेव भिंगारदिवे यांची बिनविरोध निवड झाली होती.
परंतु आरक्षण अनुसूचित जाती साठी पडल्याने भिंगारदिवे यांची येथे सरपंच पदासाठी लॉटरी लागली आहे.पोखर्डी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी रामेश्वर शिवाजी निमसे तर उपसरपंचपदी अजय बापूसाहेब कराळे यांची निवड झाली आहे. इमामपूर येथे सरपंच पदासाठी भीमराज मोकाटे तर उपसरपंच पदी लक्ष्मीबाई वाघमारे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
इमामपूर मध्ये महाविकास आघाडी ची सत्ता आली असून येथे कर्डिले गटाला नऊ पैकी चार जागांवर विजय मिळवता आला. तसेच डोंगरगण येथे वैशाली मते यांची सरपंचपदी तर संतोष पटारे यांची उपसरपंचपदी निवड झाली आहे. इमामपूर व डोंगरगण मध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. जेऊर गटात इमामपूर व डोंगरगण वगळता जवळ जवळ सर्वच गावात कर्डिले गटाचे सरपंच झाले आहेत.