Ahilyanagar News:- अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा निवडणूक ही खूप चुरशीची पाहायला मिळाली. या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गटाकडून रोहित पवार आणि महायुतीच्या भाजपाकडून प्राध्यापक राम शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात होते व या दोघांमध्ये सरळ लढत झाली.
संपूर्ण प्रचाराच्या दरम्यान या ठिकाणी टफ फाईट दिसून आली व ही चुरस अक्षरशा मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पाहायला मिळाली. अगदी शेवटी पर्यंत कोण विजयी होणार? हे निश्चित सांगता येत नव्हते. परंतु अंतिम फेरीत आमदार रोहित पवार यांच्या नावावर विजयाची मोहर उमटली व ते दुसऱ्यांदा या मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले.
परंतु त्यांच्या या विजया मागे जर बघितले तर जामखेड तालुक्याचा खूप मोठा हातभार असल्याचे दिसून येते. कारण जामखेड तालुक्यातून त्यांना निर्णायक आघाडी मिळाली व या ताकदीवरच दुसऱ्यांदा आमदार होऊ शकले. त्या तुलनेत मात्र आमदार राम शिंदे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते या ठिकाणाहून मिळाली.
जामखेडमधून राम शिंदे यांना तीन वेळा दुसऱ्या क्रमांकाची मते
जर 2009 पासून या ठिकाणाची राजकीय परिस्थिती बघितली तर प्राध्यापक राम शिंदेंनी सलग चार वेळा या ठिकाणाहून निवडणूक लढवली व 2014 हा अपवाद सोडला तर तीनदा त्यांना जामखेड तालुक्यातून दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.
विशेष म्हणजे शिंदे यांच्या जवळा जिल्हा परिषद गटातून देखील त्यांना दुसऱ्या क्रमांकावर जावे लागले. या निवडणुकीत देखील हीच गत झाली. जामखेडच्या तुलनेत मात्र कर्जत तालुक्याचा विचार केला तर या तालुक्याने आमदार राम शिंदे यांना तीन वेळा पहिल्या क्रमांकाचे मते देऊन मोठा हातभार लावला.
या निवडणुकीत देखील राम शिंदे यांना कर्जत तालुक्यातून पहिल्या क्रमांकाची मते मिळाली. परंतु जामखेड मधून रोहित पवारांना मिळालेली मतांची निर्णायक आघाडी त्यांच्या विजयामध्ये महत्त्वाची ठरले. जामखेडने रोहित पवार यांना साथ दिल्यामुळे निसटता का होईना त्यांचा विजय झाला.
या निवडणुकीत राम शिंदे यांची जोरदार तयारी आणि पवारांची धुरा सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर
झालेल्या या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून बघितले तर या निवडणुकीत विजय संपादन करण्याकरिता आमदार राम शिंदे यांनी सगळ्या प्रकारची तयारी केलेली होती. मतदार संघातील जे पहिल्या फळीतील स्थानिक नेते व अनेक क्षेत्रातील जी मंडळी रोहित पवारांवर नाराज होते त्यांना बरोबर घेऊन शिंदे यांनी प्रचारामध्ये जोरदार आघाडी घेतलेली होती.
प्रचारादरम्यान त्यांनी रोहित पवारांना लक्ष बनवले व त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. आरोप प्रत्यारोप देखील झालेत. सर्व प्रकारचे प्रयत्न करण्यात आले. तरी देखील आमदार शिंदे यांचा या ठिकाणी पराभव झाला.
त्या तुलनेत मात्र रोहित पवार यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या हाती प्रचाराची सगळी धुरा सोपवली होती व एकला चलो रे अभियान संपूर्ण तालुक्यात राबवले व सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर या निवडणुकीत बाजी मारली.