नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पातून मुख्यमंत्री लाडकी बहीण, शेतकऱ्यांची वीजबिल माफी, मुलींना उच्च शिक्षण मोफत देणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी आणल्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह सत्ताधारी मंत्रिमंडळातील सर्वांनी कौतुक केले.
जनतेच्या कामासाठी तसेच राज्याच्या विकासासाठी सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. सरकारमध्ये गेल्याने राज्याच्या हिताचे निर्णय घेता आले. मात्र, विरोधी पक्षातील काहींना या योजना आवडल्या नसल्याने त्यांच्या पोटात दुखायला लागले. या योजनांबाबत विरोधकांनी हा चुनावी जुमला असल्याचे सांगत या योजनेबद्दल टीका सुरू केली.
मात्र, अजित पवार हा शब्दाला पक्का असून, आणलेल्या योजना अडचणीत येऊ देणार नाही. पुढील काळात योजना सुरळीत सुरू ठेवण्यासाठी महायुतीला कायम सत्तेत ठेवा, असे आवाहन उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी करत उपस्थित महिलांशी संवाद साधत महिलांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.
श्रीगोंदा येथील सहकार महर्षी शिवाजीराव ना. नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या पटांगणात लाडकी बहीण योजना कार्यान्वित केल्याबद्दल तसेच ना. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ठचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी ते बोलत होते.
कार्यक्रमास महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे, दौंडचे माजी आमदार रमेश आप्पा थोरात, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे, दत्तात्रय पानसरे, बाळासाहेब नाहाटा आदींसह नेते उपस्थित होते.
पुढे बोलताना ना. पवार यांनी सांगितले की, पस्तीस वर्षे राजकारण, समाजकारण करत असताना जनतेच्या हितासाठी आणि राज्याच्या विकासासाठी सरकार बरोबर जाण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत दहा वेळा अर्थसंकल्प सादर केला.
यावर्षी सादर केलेला अर्थसंकल्प गरीब आणि महिलांच्या विकासाला समोर ठेऊन करण्यात आला आहे. महिलांना मानसन्मान देण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली असून, रक्षाबंधनाच्या काळात लाभार्थी महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे दोन हप्ते जमा करणार आहोत.
या सन्मान योजनेमुळे आर्थिक उलाढाल वाढणार आहे. विरोधक केवळ टीका करत आहेत. अजितदादा शब्दाचा पक्का दिलेला शब्द पूर्ण करणार, योजना यशस्वी करणार, जनतेच्या हिताची योजना विरोधकांना आवडली नाही, त्यामुळे त्यांच्या पोटात दुखत आहे.
महाराष्ट्रचे भले व्हावे, शेतकऱ्यांच कल्याण व्हावे, यासाठी योजना सुरू आहेत. आता कांदा निर्यात बंदी होणार नाही, मोफत वीज, दुधाला प्रतिलीटर पाच रुपये अनुदान एका रुपयात पीक विमा, मुलींना मोफत उच्च शिक्षण, अशा योजना यशस्वी करणार, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
महिला व बालविकासमंत्री मुख्यमंत्री अदिती तटकरे यांनी माझी लाडकी बहीण, या योजनेंतर्गत योजना जाहीर झाल्यापासून राज्यभरातून पंधरा दिवसांत ८५ लाखपेक्षा जास्त अर्जाची नोंदणी झालेली आहे. ३१ ऑगस्टपर्यंत अडीच कोटींपेक्षा जास्त अर्ज प्राप्त होतील, असा साधारणपणे अंदाज आहे. पात्र महिलेला जुलै आणि ऑगस्ट, या दोन्ही महिन्यांचे पैसे एकच वेळेस बँक खात्यात जमा होणार आहे. ग्रामसभेत लाभार्थी यादी जाहीर होईल. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचा पेन्शनबाबतचा प्रस्ताव आणणार असल्याचे सांगितले.
महिला जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे म्हणाल्या की, बापूंचा वसा आणि वारसा घेऊन काम सुरु आहे. अजितदादांचं श्रीगोंद्यावर लक्ष आहे. कुकडीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी दादांनी लक्ष घालावे. यावेळी नागवडे कारखाना अध्यक्ष राजेंद्र नागवडे म्हणाले की, महिला आमदार करण्यासाठी सर्वांचा सहभाग असावा.
घोड कुकडी पाणीप्रश्न, रस्ते, वीज प्रश्नात आपण लक्ष घातले. आता सर्वांना बरोबर घेऊन अनुराधाताईंना आमदार करण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन विधानसभा निवडणूक लढवू, असे ते म्हणाले.
या वेळी दिपक नागवडे, सुभाष शिंदे, विक्रम पाचपुते, महादेव नितनवरे, राकेश पाचपुते, बंडू जगताप, चांगदेव पाचपुते, सतीश मखरे यांच्यासह महिलांची मोठया संख्यने उपस्थिती होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण संपल्यावर महिलांशी संवाद साधला असता, एका महिलेने प्रश्न विचारला की, दादा विरोधक म्हणतात की, माझी लाडकी बहीण ही योजना फक्त निवडणुकीपुरती आहे का, कायमस्वरुपी ? त्यावर ना. पवार यांनी ही योजना कायमस्वरूपी चालू ठेवायची असेल तर आम्हाला कायमस्वरूपी सत्तेत बसवा, असे म्हणताच सभास्थानी एकच हशा पिकला.