सध्या भिंगार शहर हे नगर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अख्यारीत आहे. तेथील ज्या काही इतर सुविधा किंवा इतर गोष्टी आहेत त्या कॅन्टोन्मेंट बोर्डाद्वारे चालवले जाते. मागील अनेक वर्षांपासून भिंगार शहर हे नगर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अख्यारीतच आहे. परंतु आता भिंगार शहराचा नागरी भाग नगर महापालिकेत वर्ग करण्यासाठी खा. सुजय विखे व आ. सांग्राम जगताप हे विशेष प्रयत्नात आहेत. यातून स्थानिक प्रश्न व सुविधा आदी प्रश्न सुटतील व काही राजकीय गणितेही जुळतील असे म्हटले जात आहे.
चार ते सहा महिन्यात भिंगार नगर महापालिकेत
खासदार सुजय विखे यांनी माहिती दिल्याप्रमाणे भिंगार शहराचा नागरी भाग नगर महापालिकेत वर्ग करण्यासाठी दिल्ली येथे अधिवेशनात, मंत्रालयात बैठक घेण्यासाठी प्रयत्नशील राहू, राज्य सरकारकडून प्रस्ताव तयार झाला की मग तो कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे आणि त्यानंतर डिफेन्स विभागाकडे जाईल. तदनंतर दिल्ली सरकारकडून मंजुरी मिळेल असे ते म्हणाले.
राज्य सरकारच्या या प्रस्तावावर डिसेंबरमध्ये प्रक्रिया सुरू झाली की लगेच मग पुढील प्रक्रिया होऊन चार ते सहा महिन्यात भिंगारचा नगर महापालिकेत समावेश होईल असे ते म्हणालेत. नगर जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी आमदार संग्राम जगताप, महापालिकेचे आयुक्त डॉ.पंकज जावळे, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे आदींसह अनेक लोक उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप यांची भूमिका काय?
आमदार संग्राम जगताप यांनी देखील यावेळी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी यावेळी भिंगारच्या नागरी भागाचा महापालिकेत समावेश होत असल्याचे स्वागत करत आनंद व्यक्त केला. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील आलेल्या नागरिकांना महापालिकेत समाविष्ट होणार का? असे विचारले तर लगेच सर्वानी हात उंच करून उत्साहात होकार दिला.
आ. जगताप यावेळी म्हणाले की, 2019 पासून भिंगारचा महापालिकेत समावेश व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे. तसा पाठपुरावा करत आहे. परंतु मध्यंतरी कोरोना आणि त्यानंतर सत्तांतरामुळे हा विषय आहे तसाच राहिला. पण आता हे काम झपाट्याने होईल. एकदा का भिंगार उपनगर म्हणून अस्तित्वात आले की त्याच्या विकासासाठी राज्य आणि केंद्राकडून भरपूर निधी आणण्यात येईल असे आश्वासन जगताप यांनी यावेळी दिले.
महापालिका नको स्वतंत्र नगरपालिका करा
दरम्यान यावेळी उपस्थित असणाऱ्यांपैकी काहींनी भिंगार शहराचा महापालिकेत समावेश होण्याऐवजी स्वतंत्र नगरपालिका द्या अशी मागणी केली. परंतु ही क्लिष्ट आणि वेळखाऊ प्रक्रिया असल्याचे खा. विखे म्हणाले. त्यामुळे सध्या भिंगार शहराला एकतर महापालिका किंवा ग्रामपंचायतीत समावेश व्हावे लागेल व मग त्यानंतर नगरपालिकेसाठी पाठपुरावा करता येईल असे विखे यांनी स्पष्ट केले.
भिंगारमध्ये राजकीय संघर्ष ?
भिंगार शहराचा महापालिकेत समावेशच्या निर्णयाची बैठक कलेक्टर ऑफिसमध्ये होताच भिंगारमधील सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये याचे वेगळे पडसाद उमटायला सुरवात झाली. कॅन्टोनमेंट बोर्डाचे माजी सदस्य तसेच काही राजकीय पदाधिकारी हे आपली वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे समजते. त्यामुळे येथे राजकीय संघर्ष होणार का? अशी चर्चा आहे.
भिंगार महापालिकेत वर्ग झाल्यास ‘इतकी’ प्रॉपर्टी महापालिकेकडे वर्ग होईल
जर ही प्रक्रिया पूर्ण झाली तर कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अख्यारीत असलेल्या भिंगार शहरातील बराच भाग नगर महापालिकेत वर्ग होईल. भिंगारमधील शिवाजी पार्क, भिंगार टेकडी, हाॅस्पिटल, चारही शाळा, सार्वजनिक स्वच्छता गृह आदी मोठा महापालिकेत जाईल. सध्या नगर कॅन्टोनमेंट बोर्डाकडे असलेल्या 662 मूळ आणि 82 भाडेतत्त्वावर असलेल्या प्राॅप्रर्टी देखील महापालिकेत वर्ग होतील. येथे काही ब्रिटिशकालीन बंगले आहेत, ते मात्र कॅंटोन्मेंट बोर्डाकडेच राहणार असल्याचे समजते.