राज्यात चालू खरीप हंगामासाठी भ्रमणध्वनीद्वारे ई-पीक पाहणीची सुविधा सर्व शेतकऱ्यांसाठी येत्या १ ऑगस्टपासून उपलब्ध होणार आहे.
राज्यात सरासरी १४२ लाख हेक्टरवर खरीप हंगाम घेतला जातो.
यापैकी यंदा १५ जुलैपर्यंत शेतकऱ्यांनी १२३ लाख हेक्टरच्या (८७ टक्के) पुढे पेरा पूर्ण केला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीपर्यंत पेरा ८१ टक्के झाला होता. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू खरिपात पेरण्यांची गती चांगली आहे.
पेरण्यांनंतरची विविध पिकांच्या रोप उगवणीबाबत किंवा वाढीच्या अवस्थांविषयी कोणात्याही तालुक्यातून अद्याप तक्रार आलेली नाही. राज्यात पाऊसदेखील चांगला झालेला आहे. १ जून ते १५ जुलैदरम्यान राज्यात सरासरी ३६७ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असतो.
परंतु यंदा याच कालावधीत ४१० मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या १११ टक्क्यांच्या पुढे पाऊस झालेला आहे. त्यामुळे भाताची पुनर्लागवड वगळता इतर बहुतेक खरीप पिकांच्या पेरण्या शेतकऱ्यांनी आटोपल्या आहेत.
ई-पीक पाहणीची जबाबदारी भूमी अभिलेख आयुक्तालयाकडे आहे. त्याविषयीच्या नियोजनांचा आढावा अलीकडेच आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह तसेच ई -पीक पाहणी प्रकल्पाचे राज्य समन्वयक उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे यांच्या चमूने घेतला.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, शेतकरीस्तरावरील ई-पीक पाहणी १ ऑगस्टपासून सुरू झाल्यानंतर ४५ दिवस चालू राहील, १५ सप्टेंबरला शेतकऱ्यांच्या स्तरावरील ई-पीक पाहणी समाप्त होईल.
शासनाकडून शेतकऱ्यांना पुन्हा मुदतवाढ न मिळाल्यास लगेच १६ सप्टेंबरपासून तलाठी किंवा सहाय्यक स्तरावरील ई-पीक पाहणी सुरू होईल. तलाठी आपापल्या पातळीवरील पाहणीची कामे पुढील ३० दिवस माणजेच १५ ऑक्टोबरपर्यंत चालू ठेवतील.