Ahmednagar News : यावर्षी जूनमध्ये समाधानकारक पाऊस झाला आहे. सध्या शेतामध्ये चांगल्या प्रकारची पिके आलेली आहेत. सध्या खरिपाच्या पिकांची मशागत करण्यात शेतकरी व्यस्त आहेत. मात्र या मशागतीनंतर पिकांना युरियाची गरज आहे.
परंतु सध्या शेतकऱ्यांना युरिया मिळत नाही. काही दुकानांमध्ये युरिया घ्यायचा असेल तर त्याच्याबरोबर गरज नसताना इतर खते घ्यावी लागतात. काही दुकानात मोजक्या आणि मोठ्या शेतकऱ्यांनाच युरिया देतात,इतर गरीब आणि छोट्या शेतकऱ्यांना युरियाच मिळत नाही, अशा शेतकऱ्यांनी काय करावे.
काही दुकानदार युरियाऐवजी त्याला पर्याय म्हणून इतर खते घेण्याचा पर्याय सुचवतात; परंतु त्या खतांचे जास्त दर असतात आणि ते शेतकऱ्यांना घ्यायला परवडत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचा खर्च करावा लागत आहे.
निवडणूक काळात सर्वच राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण करतात आणि आपली राजकारणातली पोळी भाजून घेतात. परंतु शेतकऱ्यांच्या खऱ्या समस्यांकडे कोणताच राजकीय पक्ष लक्ष देत नाही. यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने पिके चांगली आली आहेत; परंतु युरियाच उपलब्ध नसल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
युरिया खताची वाढती मागणी लक्षात घेता राज्य सरकारच्या कृषी खात्याने युरियाचा बफर स्टॉक खुला करून देण्याची तसेच युरिया खताबरोबर पूरक खते औषधे घेण्याची शेतकऱ्यांना सक्ती करू नये.
अशी मागणी करणारे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्व संबंधितांना दिले असून, याबाबत तातडीने कार्यवाही झाली नाही तर प्रसंगी आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवण्याचा निर्धार फुंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
दक्षिणेतील शेवगाव तालुक्याच्या काही भागात दमदार पाऊस झाला. तर काही भागात पावसाचे प्रमाण साधारण आहे. झालेल्या पावसावर यंदाच्या खरिपातील कापूस, तुर, मूग, बाजरी, सोयाबीन, मका, ऊस, भाजीपाला, फळबागासह चारा पिके जोमात आहेत. तालुक्याच्या काही भागात रिमझिम पाऊस आहे.
गेल्या आठवड्यात पावसाने उघडीप दिल्याने फवारणी खुरपणीची कामे उरकून घेतली. या पिकांना खते देण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग उडाली आहे.