Ahmednagar News : कोपरगाव १५१ नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी सेवा सहकारी संस्थांना केंद्र सरकारच्या ऑरगॅनिक संघ, राष्ट्रीय बीज सहसमिती व एक्सपोर्ट संघाचे सभासद न्हावे लागणार आहे. त्यासाठी शेअर्स ‘खरेदी करावे लागणार असून ‘अ’ वर्ग प्राप्त सक्षम सहकारी संस्थेला शेअर्स खरेदीसाठी लागणारी अर्धी रक्कम सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखाना स्वतः भरेल.
तसेच शेतकऱ्यांना शेतकरी उत्पादक कंपनी स्थापनेसाठी मार्गदर्शनासाठी तज्ज्ञांना द्यावी लागणारी रक्कमही कारखान्यातर्फे देण्यात येईल, अशी घोषणा संजीवनी उद्योग समूहाचे बिपिन कोल्हे यांनी कोल्हे कारखाना कार्यस्थळावर विविध संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव यांना मार्गदर्शन करताना केली.
भारतातील बहुतांश शेतकरी अल्प आणि अल्पभूधारक आहेत. या शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी वित्त, बाजारपेठ आणि इतर कृषी विषयक सेवांमध्ये त्यांचा प्रवेश सोपा व सुखकर होण्याच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी सहकार चळवळ मजबूत करण्यासाठी सहकार मंत्रालयामार्फत ४८ मोठे उपक्रम हाती घेतले आहेत.
त्याद्वारे सर्व सहकारी संस्थांच्या आर्थिक विकासासाठी व विस्तारासाठी नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. या संस्था बळकट करण्यासाठी शासन स्तरावर मोठे प्रयत्न होत असून हे दोन्ही संस्थांच्या प्रगतीसाठी फायदेशीर ठरणारे आहे.
विविध १५१ व्यवसाय सुचवले असून तालुक्यातील सक्षम विविध कार्यकारी सेवा सहकारीसंस्था व शेतकऱ्यांनी याचा लाभ घेऊन आर्थिक प्रगती साधावी असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त जिल्हा कृषी अधिकारी प्रकाश सांगळे, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तालुका विकास अधिकारी ए. डी. काटे, कृषिभूषण ग्रोवर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष भूषण निकम यांनी सहकारी संस्थांनी करावयाच्या व्यवसायाची सविस्तर माहिती दिली.
स्वागत उपाध्यक्ष मनेष गाडे, साहेबराव कदम, संचालक रमेश आभाळे, सतीश आव्हाड यांनी केले. सूत्रसंचालन व प्रास्ताविक कारखान्याचे सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी केले.
यावेळी नानासाहेब गव्हाणे, प्रकाश गोर्डे, अनिल खालकर, देवराम गवळी, साहेबराव शिंदे, साहेबराव पाचोरे, कैलासराव रहाणे, हरीदास रहाणे, अर्जुन गोसावी, रमेशराव आभाळे, शिवाजीनाना गवळी, अण्णासाहेब गुरसळ,
कर्णासाहेब वक्ते, दादासाहेब चव्हाण, चिलीया गुरसळ, अशोक पवार, आबासाहेब पवार, सतीश आव्हाड, संजय आभाळे, रंगनाथ उगले,धर्मा शिंदे आदींसह तालुक्यातील विविध गावांतील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार कैलास रहाणे यांनी मानले.